कागदपत्रे नसलेली 10 वाहने पोलीस ठाण्यात जमा
बीड (प्रतिनिधी)- माजलगाव शहरात बुधवारी दि.23 ऑक्टोबर 2024 रोजी 50 रिक्षा व 25 मोटारसायकल अशा एकूण 75 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील 10 रिक्षाचालकांनी कागदपत्र हजर न केल्याने ही वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
माजलगाव शहरात 40 ते 50 अॅटोरिक्षा, प्रवासी रिक्षा व 25 मोटार सायकल यांच्यावर जिल्हा वाहतुक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. विना कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स व इन्शुरन्स नसलेली वाहने, पियुसी नसलेली वाहने तसेच गाड्यावर काका, मामा, नाना, दादा अशी उपाधी लावलेली वाहने या सदराखाली तपासणी करुन 70 ते 80 हजार रुपये दंड आकारण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्री.अविनाश बारगळ, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री.सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल सुर्यतळ, जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी श्री.सुभाष सानप यांच्या अधिपत्त्याखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस हवालदार दत्ता उबाळे, नितीन शिंदे, बाळासाहेब नागरगोजे, पोलीस नाईक आदिनाथ मुंडे, चालक हवालदार हरके, माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गोविंद पाखरे, अंमलदार कानडे हे सर्व या कारवाईमध्ये सामील होते.
तरी या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व वाहनचालकांनी आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाची कागदपत्रे, वाहनाचा इन्शुरन्स, पियुसी इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगावी व पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुभाष सानप यांनी केले आहे.