बीड मतदारसंघात डझन भर नेते लागले कामाला
बीड । निलेश पुराणिक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे कारण हा मतदारसंघ 15 वर्षे शिवसेनेकडे राहिला आहे तर कधी 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यामुळे यावेळी नेमके कोण बाजी मारेल हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.
15 व्या विधानसभा निवडणुकीची रेलचेल अवघ्या महाराष्ट्रात सुरु आहे. बीड जिल्ह्यातील एकूण सहाही मतदारसंघात शतकभर नेते कामाला लागले असून बीड मतदारसंघात तर 1 डझन नेत्यांना आणि विस्थापित लोकांना आमदारकी पाहिजे आहे.
बीडकरांनी विकासाची अपेक्षा करतांना सर्व जाती-धर्माला संधी दिली मात्र बीडकरांच्या वाट्याला सारखी-सारखी निराशाच आली या मतदारसंघाने मराठा नेतृत्व स्वीकारले, मुस्लीम नेतृत्व स्वीकारले, ओबीसी नेतृत्व स्वीकारले त्यामुळे कोण्या जातीला बीडकर नेहमी स्वीकारतात असे म्हणणे चुकीचे ठरेल.
बीडकरांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून 1990 आणि 1995 साली सुरेश नवले यांना विधानसभेत पाठवले पुन्हा 2004 साली सुनिल धांडे यांना शिवसेनेत पाठविले त्यामुळे एकुण 15 वर्ष शिवसेनेला सत्ता दिली त्यामध्ये शिवसेना ही सत्तेत देखील होती तरी देखील म्हणावा तसा विकास झाला नाही यामुळे 2009 साली जयदत्त क्षीरसागर यांना 1 लाख 9 हजार 163 अशा प्रचंड मतांनी विजयी करत विकास होईल अशी अपेक्षा बीडकरांनी बाळगली. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्या नंतरचे उमेदवार आणि प्रमुख प्रतिस्पर्धी सुनील धांडे यांना केवळ 33, 246 मते मिळाली त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा दारुण पराभव झाला परंंतू पुढे जयदत्त क्षीरसागरांनी बीडमध्ये म्हणावी तशी कामे केली नाही अशीच चर्चा आज देखील जनतेमध्ये होत आहे. जयदत्त क्षीरसागर यांना कंटाळून लोकांनी त्यांचे पुतणे आणि त्यावेळचे प्रमुख प्रतिस्पर्धी संदीप क्षीरसागर यांना विजयी केले परंतू त्यांनी देखील ना पाणी प्रश्न सोडविला ना बीड मतदारसंघातील खेड्या पाड्यातील रस्ते प्रश्न सोडविला, आजही नळाला पाणी आले किंवा थोडा जरी पाऊस पडला तरी शाहूनगर भागातील सम्राट चौकापासून ते अंबिका चौकापर्यंत रस्त्यावर नालीचे पाणी येते त्यामधून लोकांना जाणे-येणे मुश्कील होते, बीडमध्ये ठिकठिकाणी कचर्याचा प्रश्न गंभीर आहे तसेच जालना रोड ते बार्शी रोड रस्ता बांधल्यावर साईडच्या बाजू न भरल्या गेल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे का तुम्हाला निवडून द्यायचे, तुम्ही या अगोदर दिलेली आश्वासने कुठे पुर्ण केली मग आम्ही तुम्हालाच सारखे सारखे मतदान का करायचे असा प्रश्न जनता विचारू लागली आहे.
इतर काहीही असो हा विधानसभा मतदारसंघ नेहमी कुठल्या प्रलोभनाला नाही तर विकासाचे आश्वासन देणार्या नेत्यांना विजयी करतो मात्र यावेळी जनता कितपत भरवसा कोणावर ठेवते हे पाहायला आता घोडामैदान जवळच आहे त्यामुळे राष्ट्रवादी-शिवसेना कोण राखेल पुन्हा बीडचा गड हे काही दिवसातच कळेल.