स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन !
मुंबई (प्रतिनिधी)-गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात होती.परळी येथे सर्व संघटनांनी एकत्रित येत गेल्या 25 फेब्रुवारी रोजी ब्राह्मण ऐक्य परिषदही घेतली होती. या ऐक्य परिषदेनंतर या मागणीला ताकदीने शासन दरबारी सादर करण्यात सकल ब्राह्मण समाजाला यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी याविषयी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाशी महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या, चर्चा केल्या, सातत्यपूर्ण पाठपुराव्याने व ब्राह्मण ऐक्याने राज्यात एक इतिहास घडला असून आजच्या मंत्रिमंडळ निर्णयात ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी विविध स्तरातून सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे ही मागणी लावून धरण्यात आलेली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच या संदर्भाने ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाची विशेष बैठक घेऊन चर्चा केली. अमृत संस्था कायम ठेवून येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब्राह्मण समाजासाठी आता अमृत संस्थेच्या सर्व लाभांबरोबरच स्वतंत्रपणाने आर्थिक विकास महामंडळ ही स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाला 50 कोटी रुपये इतकी भरीव निधीची तरतूदही राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या निर्णयाचे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येत असून सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आभारही व्यक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान परळी वैजनाथ येथे 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाज संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी ब्राह्मण ऐक्य परिषद घेतली होती. संपूर्ण राज्यभरात ही ब्राह्मण ऐक्य परिषद गाजली होती. या ऐक्य परिषदेच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मोठ्या ताकतीने आवाज उठवला गेला होता. त्यानंतर शासन स्तरावर याचा पाठपुरावा करून अखेर या संपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आणि ब्राह्मण समाजाच्या पदरात अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे हे आर्थिक विकास महामंडळ पडले. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सकल ब्राह्मण समाज आभार व्यक्त करत आहे.
ब्राह्मण ऐक्याने घडविला इतिहास; कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही- बाजीराव धर्माधिकारी
दरम्यान, सकल ब्राह्मण समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय झाल्यानंतर ब्रह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सरकारचे आभार व्यक्त करताना सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली. बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित व जिव्हाळ्याचा विषय अखेर मार्गी लागला.महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. त्यासाठी सकल ब्राह्मण समाज कृतज्ञ आहे. त्याचबरोबर ब्राह्मण समाजासाठी अमृत संस्थेचे सर्व लाभही संरक्षीत करण्यात आले आहेत.ब्राह्मण ऐक्याची वज्रमूठ, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजितदादा पवार यांनी अतिशय आत्मियतेने व ब्राह्मण समाजाचा सन्मान राखत हा निर्णय करण्यासाठी वेळोवेळीच सकारात्मक भूमिका घेतली. यामध्ये आमचे नेते खा.सुनील तटकरे व ना.धनंजय मुंडे ,माजी मंत्री आ.पंकजाताई मुंडे यांनी ब्राह्मण समाज व सरकार या दोहोतील दुवा म्हणून काम केले.यासाठी ब्राह्मण समाजातील विविध संघटना,सर्व स्तरातून अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यथाशक्ती, यथामती प्रयत्न केले. एकंदरीतच परिपाक म्हणजे अमृत संस्थेचे सर्व लाभ संरक्षीत करत स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले.हा एक इतिहास बनला असुन ही बाब कृतज्ञा व कृतार्थ करणारी अशीच आहे. सर्वांचे मनापासून शतश: आभार!