सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन – बाजीराव धर्माधिकारी
परळी वैद्यनाथ (वृत्तसंस्था)-राज्यातील ब्राह्मण समाजासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व प्राप्त परिस्थितीनुसार आवश्यक ठरणार्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सादर करण्यात आले. ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असुन सर्व मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भाने सरकारच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला आश्वासित करून अमृत संस्था कायम ठेवून लवकरच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. त्याचप्रमाणे यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारला ब्राह्मण समाजाच्या सात प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या. दिलेल्या निवेदनात अमृतमधून ब्राह्मण समाज बाहेर न पडता भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण व्हावे ,राज्यात स्वतंत्र एथड मंत्रालय स्थापन व्हावे , ब्राह्मण समाजासाठी विशेष संरक्षण कायदा निर्माण व्हावा , ब्राह्मण समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना पुणे,ठाणे, संभाजीनगर,नागपूर नाशिक, कोल्हापूर, लातूर, अंबेजोगाई, नांदेड, अहमदनगर सह विविध ठिकाणी वसतिगृह उभारणे,शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करीत सुशोभिकारणसाठी निधी उपलब्ध करुन देणे ,बाजीप्रभु देशपांडे यांचे घोडखिंड येथे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करणे, राज्यातील पुरोहितांना व वैदिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मानधन सुरु करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांबाबत चर्चा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाच्या या सर्व मागण्या न्याय मागण्या असुन सरकार या सर्व मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक व कटिबद्ध आहे. येणार्या काळात एकेक करून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. असे आश्वासन त्यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती ब्राह्मण मुख्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.