बीड (वृत्तसंस्था)- बीड शहरातील सुभाष रोड व बाजूच्या कडा न भरता झालेला जालना रोड, बार्शी यांचा अपवाद वगळता सर्वच महत्वाची रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे वाहन चालविणे मोठे कठीण जात आहे. रस्ते छोटे व वाहने जास्त झाल्याने नागरिकांना वाहने चालवतांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. शहरातील सम्राट चौकमधून पांगरीकडे जाणारा रस्ता, मोंढा रोड, धानोरा रोड या मुख्य रस्त्यावरून मोठी वाहतूक होत असते. हे रस्ते शहरातील मोठ्या बाजारपेठांकडेजाणारी मुख्य रस्ते असल्याने या रस्त्यांवर नागरिकांची, विद्यार्थ्यांची तसेच खेड्यापाड्यातून येणार्या ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते अशा चाळण झालेल्या रस्त्यांची अनेकवेळा मागणी करून देखील या रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बीडमध्ये निवडुन येणारे लोकप्रतिनिधी सुरुवातीला नागरिकांना रस्ते, पाणी व मुलभूत सुविधा पुरवू असे वचन देवून निवडून येतात मात्र 5 वर्षात रस्ते देखील पुर्ण बांधता आले नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शहरातील सम्राट चौकातून पांगरी रोडकडे जाणारा रस्ता कित्येक दिवसांपासून खड्डेमय झालेला असून पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचते विशेष म्हणजे हा प्रश्न 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे या रस्त्याचा आजपर्यंत निवडुन आलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधींना इतका तिटकारा का असा सवाल जनता विचारत आहे या रस्त्यातून जातांना नागरिकांना व खेड्या-पाड्यातून येणार्या ग्रासम्थांना मोठी कसरत करावी लागते तसेच येथे जवळच अनेक कोचिंग क्लासेस असून विद्यार्थ्यांची पालकांची हेळसांड होत आहे.
मोंढा रोडची तर अक्षरशः चाळण झाली असून जालना रोडवरून एमआयडीसी भागाकडे जाण्यासाठी देखील या रस्त्याचा वापर होतो. तसेच या रस्त्यावर अनेक खासगी दवाखाने, विविध व्यावसायिकांचे दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कायम रहदारी असते. परंतु, अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. परंतु या रस्त्याची साधी डागडुजी सुद्धा करण्यात आलेली नाहीये. या खड्यांमुळे अपघात होऊन आत्तापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, त्याच प्रमाणे याच रस्त्यालगत शहरातील स्मशानभूमी असल्याने नागरिकांना या रस्त्याने जाणे मोठे जिकिरीचे ठरते. सध्या पावसाळा सुरू असून शहरात झालेल्या पावसाने या रस्त्यावरील बहुतांश खड्ड्यात पाणी साठल्याने या खड्ड्यांचा देखील अंदाज येत नाही. वाहनधारकांना या खड्यांतून प्रवास करणे मोठे जिकिरीचे ठरत आहे.
अशीच दुरावस्था शहरातील महत्वाच्या बाजारपेठेमधून जाणार्या धानोरा रोडची देखील झाली असून अनेकवेळा मागणी करून देखील या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. सध्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.