वेळोवेळी मागणी करुनही शहराकडे दुर्लक्ष करणार्‍या अकार्यक्षम मुख्याधिकारी अंधारेंची हकालपट्टी करावी अन्यथा 15 ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन

शिवसंग्राम अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

बीड । निवेदक
शहरातील पाणीप्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, नाल्या तुंबल्याचा प्रश्न याबाबत अनेकदा प्रत्यक्ष भेट घेवून व लेखी निवेदन देवून देखील कसलेही काम करत नसलेल्या अकार्यक्षम असलेला निता अंधारेंची हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसंग्राम अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांनी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली आहे जर मागणी पुर्ण नाही झाली तर 15 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पुढे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मोहम्मदीया कॉलनी, दाऊदपुरा, इस्लामपुरा, मिल्लत नगर, मोमीनपुरा, स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूचा परिसर, सम्राट चौक या परिसरातील रस्त्यावरील कचराकुंडी, सोमेश्वर नगर या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून कचरा साचला आहे तसेच नाल्या तुंबल्या आहेत या विषयाचे निवेदन पावसाळ्या अगोदर तसेच मुस्लीम समाजाचा पवित्र सण असलेल्या रमजाण ईद अगोदर बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांना निवेदने देवून याबाबत मागणी केली होती परंतू त्यांनी महत्वाच्या सणाच्या वेळी तसेच महत्वाच्या ऋतुमध्ये देखील कसलीही काळजी न घेतल्याने या परिसरातील अनेक नागरिकांना डेंग्युसारख्या जिवघेण्या आजाराची लागण झाली आहे व बाबीस सर्वस्वीरित्या बीड नगर पालिकेच्या अकार्यक्षम मुख्याधिकारी निता अंधारे याच जबाबदार आहेत कारण की, कुठल्याही मागणीची त्या गांभीर्याने दखल घेत नाहीत तसेच निवेदन दिले की केवळ स्वीकारण्याचे काम करतात.
शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून याची दखल वेळीच घेतली नाही तर खुप मोठी महामारी देखील उद्भवू शकते.तसेच या अगोदर मी व शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी देखील नगरपालिकेत जावून त्यांची भेट घेवून याविषयी चर्चा केली व लेखी निवेदन देखील दिले त्याच्या प्रत माझ्याकडे आज देखील उपलब्ध आहेत कितीही निवेदने दिली तसेच तक्रारी केल्या, दैनिकांत बातम्या छापून आल्या तरी देखील त्यांच्या कार्यप्रणालीवर कुठलाच फरक पडत नाही. तसेच शहरात दिवाबत्ती व पाणी पुरवठ्याची सोय करणे ही नगर पालिकेची प्राथमिक जबाबदारी असते तरी देखील वेळेचे कुठलेच नियोजन नसल्याने पाणीप्रश्न हा गंभीर प्रश्न होवून बसला आहे तसेच लाईट नसल्यामुळे शहरात प्रचंड चोर्‍याचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर शहरात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळायला तयार नाही त्या सोबतच रस्त्यावरुन प्रवास केल्यानंतर मणक्याचा आजार उद्भवल्याशिवाय राहणार अशा पद्धतीने अख्ख्या बीडमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे अशा अकार्यक्षम असलेल्या मुख्याधिकारी यांना मा.जिल्हाधिकारी बीड यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे व त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करावी अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत निवेदनावर शेख अझहर, शेख अखिल, अमजद खान, शकिल भाई, शेख रहीम, शेख सलमान यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a comment