अग्रलेख

गेल्या चार ते पाच दिवसात विविध ठिकाणी दोन घटना घडल्या आहेत. पैकी पहिली एक घटना म्हणजे पुण्याजवळ भुशी येथे एका धबधब्या नजदीक शूटिंगच्या नादात एक संपूर्ण कुटुंब पाण्यामध्ये वाहून गेलं. लहान जीवाचा देखील समावेश आहे. तर दुसरी घटना बीड जवळील बायपास येथे घडली. रील बनवण्याचे नादात दोन तरुणांकडून वाहनावरील ताबा सुटला अन रस्त्याच्या कठढ्याला गाडी धडकली, यावेळी गाडीचा वेग इतका होता की यामध्ये एक जण जागीच ठार झाला व एक जण गंभीर होवून उपचार घेत आहे.
मुळात एखादी गोष्ट अति झाली की ती गोष्ट माती होते ही म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे त्यामुळे सावधानता हिताची असते परंतु इंटरनेटच्या वा सोशल मीडियाच्या या मोह जाळ्यात किंवा मायाजाळात अडकलेल्या आणि फेसबुक,व्हाट्सअप, रील, व्हिडिओ, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर यांचे वेड लागलेल्या तरुणाईला हे कधी कळणार? व आता अलीकडच्या काळात मोबाईल पाहण्याने निद्रानाश किंवा मायग्रेन यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे असा कित्येकदा डॉक्टरांचा निष्कर्ष समाजासमोर आला आहे.
समाजमाध्यमांवर काही व्यक्ती रील टाकतात ते कधी कधी लोकोपयोगी असतात जसे की, काही रील या संघणकीय माहितीच्या असतात तर काही रील या सामान्य ज्ञानाचे प्रश्न सोडवणार्या असतात त्यामुळे रील बनवणार्या लोकांना लोकांशी जोडून राहावे वाटते आणि त्यामुळे लोकांना मदत होते त्यामुळे रील टाकणार्या लोकांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढते आणि त्यांना प्रतिसाद देखील तेवढाच मिळतो त्यामुळे काही तरुण-तरुणी याकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहतात.
मुळात रील बनवणारे जास्त करुन तरुण वयातील मुले-मुली आहेत या वयात थ्रील (आनंद) मिळवणं हे मेंदू, शरीर आणि हार्मोन्सच्या माध्यमातून होत असते. समाजमाध्यमांवर ते सहज मिळतंय व पैसा देखील मिळतोय म्हणून काहीही रील बनवणे आणि समाजमाध्यमावर अपलोड करणे असाच जणू सपाटा सध्या सुरु झाला आहे. पुर्वी किल्ला चढणे, उंचावर जाणे, मैदानी खेळ खेळणे, बैठे खेळ खेळणे अशा गोष्टी केल्या जायच्या. आता कष्ट न करता हे थ्रील मिळतं आणि पैसा भेटतो म्हणून काहीही जिवघेणा प्रकार सुरु आहे.
हल्लीच्या काळात तर कोणी रील करत असतांना रेल्वेच्या रुळावर उभा राहुन रील करतो तर कोणी धावत्या गाडीवर डोंगर चढ करत असतो इतके जिवघेणे प्रकार आपण पाहतो आता तर कार्यक्रमात किंवा कुठल्याही ठिकाणांना भेटीदरम्यान फोटो किंवा रील काढल्याशिवाय काम/कार्यक्रम पूर्ण होत नाही. मग ते नव्याने जन्माला आलेला एक महिन्याचं बाळ असो त्याच्या बारशाचे कार्यक्रम, वाढदिवसाचे कार्यक्रम, लग्नाचे कार्यक्रम, नवीन जोडपं फिरायला गेल्यावर बाहेरचे प्रेक्षणीय ठिकाणाचे रील, पुढे एखाद्या बैठकीचा कार्यक्रम या सर्वांचे फोटो आणि व्हिडीओ ज्या माध्यमातून रील्स तयार होतील आणि अपलोड कधी करता येतील यासाठीच आजची तरुणाई वेळ वाया घालवते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मल्यापासून व्हिडिओ तयार केला जातो तो इथपर्यंत की तो व्यक्ती आयुष्यभर काय करतो आता थोडे पुढचे सांगावे वाटते ते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचाच व्हिडिओ राहिला आहे. अपवाद राहतो फक्त मोठी मोठी नामांकित व्यक्ती यांचा. कारण की नामांकित व्यक्ती यांचे अंत्यसंस्काराचे फोटो आणि व्हिडिओ तयार केले जातात कदाचित ही परंपरा उद्या सामान्यत देखील येईल म्हणजे जिथे रडून दुःख व्यक्त करायचे असेल तिथे देखील व्हिडीओ चांगला आला की नाही याचेच थ्रील/आनंद घेण्याचा लोक प्रयत्न करतील हेया कलयुगातील दुर्देवच !