
बीड । निवेदक
निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा जणू ओलांडल्या आहेत अशा धिम्या गतीने बीड शहरातील नगर रोड सारख्या महत्वपुर्ण रस्त्याचे काम अगदी मंद गतीने चालू असून स्थानिक नागरिक व रहिवासी व्यापार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 4 महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी होवूनही सरकारी कार्यालये असलेल्या परिसरात देखील रस्त्याचे काम होत नाहीये.
हजारोंच्या संख्येने ये-जा करणार्या नागरिकांसाठी मुख्य रस्ता असलेल्या शहरातील नगर रोडवरील रस्त्याचे काम मंद गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक बर्याच अडचणींतून जात आहेत. त्याचबरोबर मंद गती आणि सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आतापर्यंत या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत असे असूनही या मंद कामाकडे कोणी अधिकारी किंवा कोणते नेते लक्ष देत नाहीत.
बीड-अहमदनगर रस्त्यावर अवजड वाहने देखील ये-जा करत असल्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, पावसात तर विचारता सोय नाही अशी दशा आहे.
तसेच वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावण्यात येत असल्यानेे वाहनचालकांना याचा देखील त्रास सहन करावा लागतो. परंतू त्यावर नगरपालिका अथवा कोणता नेता पुढे येवून काही कार्यवाही करत नाही. सध्या नगर रोडवर सरकारी कार्यालयाच्या परिसरात एकच रस्ता चालू असल्यामुळे मोठी वाहने तसेच दुचाकी वाहने विशेषतः नागरिक चांगलेच चाचपडतात.
तसेच मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर धुळ होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.