बीड नगर परिषदेने पाऊस येण्या अगोदर नदी व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करावे- अनिल जगताप

बीड। निवेदक
मान्सून तोंडावर आला असून आता बीड नगर परिषदेने नदी व नाल्यांच्या सफाईच्या वांजोट्या बैठका बंद करून प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करावे. याबरोबरच जे.से.बी., ट्रॅक्टर आदी मशनरीसह स्वतंत्र मजुरांची नियुक्ती करुन नदी व नाल्यांच्या साफ-सफाईचे काम वेगाने करावे अशा सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना दिल्या आहेत.
बिंदुसरा नदीपात्रात मोठमोठी बाभळीची झाडे उगवली आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरूंद व अस्वच्छ झाले आहे. या झाडांना पाणी अडुन पाणी शहरात घुसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. शहरातील आसपासच्या भागातील कचरा, घाण पाणी तसे रूग्णालयातील घातक कचरा उचलुन बिंदुसरा नदीपात्रात टाकला जात असल्याने नदीचे पात्र अरूंद होण्याबरोबरच नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असुन रूग्णालयातील जैविक घातक कच-यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे संबंधित प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
याबरोबरच बिंदुसरा नदीपात्रा शेजारील राहणा-या तब्बल 300 घरांना महापुराचा धोका असुन नगरपालिकेकडुन कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. यापुर्वीही अशा दुर्घटना घडुन वित्तहानी व जिवितहानी झालेली असुन शहरातील मोमीनपुरा, खासबाग,जुना मोंढा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पेठ बीड भागातील लोकांची पुर आल्यानंतर तारांबळ उडते. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यात यावी. मान्सूनचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. मात्र अद्याप अपेक्षित अशी कृती बीड नगर परिषदेकडून दिसत नाही. मान्सूननंतर सफाईसफाईचे काम करणे अशक्य असून नदी नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई न झाल्यास बीडवासियांना मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येईल. यामुळे बीड नगर परिषदेने तात्काळ आपली यंत्रणा नदी नाल्यांच्या साफसफाई साठी मार्गस्थ करावी. अशा सूचना अनिल जगताप यांनी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना दिल्या आहेत.

Leave a comment