
अंबाजोगाई । निवेदक
महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार), मित्र पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांचे बर्दापूर जि.प.सर्कल तसेच अंबाजोगाई शहरात बळ वाढले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात – (शरदचंद्र पवार) अनेकांनी जाहीर प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करणार्या सर्वांचे बीड जिल्हा पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे यांनी सहर्ष स्वागत केले. या तरूणांनी महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) च्या वतीने जाहीर पक्ष प्रवेशाचे आयोजन अंबाजोगाई शहरातील डॉ.नरेंद्र काळे यांचे संपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्यातील बर्दापूर सर्कल मधील माजी सरपंच, माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी बीड जिल्हा पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव गित्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 25 ते 30 प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) जाहीर प्रवेश केला. पक्षाच्या वतीने बीड जिल्हा पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे यांनी प्रवेश करणार्या सर्वांचे स्वागत करून उपस्थितांना समायोचीत मार्गदर्शन केले. अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश करणार्या अनेकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना, पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला आम्ही कदापीही तडा जाऊ देणार नाही. एकेकाळी चहा विकणारे मोदीजी जर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. तर एका सामान्य शेतकर्याचा मुलगा, शेतकरीपुत्र बजरंग मनोहर सोनवणे हे बीड जिल्ह्याचे खासदार नक्कीच होवू शकतात..! असे विचार मांडले. व विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (शरदचंद्र पवार) चे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील प्रादेशिक पक्षांची केलेली पक्ष फोडाफोडी आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या पैशाचा केलेला अपहार आणि अशाच नेत्यांना दिलेली क्लीन चीट तसेच भ्रष्ट व दर्जाहीन राजकारणाला सर्व जनता आता कंटाळली आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार आणि विद्यार्थी वर्गाला वेठीला धरले आहे. बेरोजगारी, महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शेतकर्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला हमीभाव नाही, तपास यंत्रणांचा गैरवापर करून दबावतंत्र वापरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे पक्ष फोडून महायुती सत्तेवर आली आहे. बीड जिल्ह्यातील घराणेशाही, दडपशाही व दबावतंत्राच्या राजकारणाला यावेळी जनता कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही. मी माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमय (शरदचंद्र पवार) कसा करता येईल असे काम करणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मोठी मेहनत घ्यावी लागेल. माझ्यावर पवार साहेबांनी जो विश्वास दाखवून पक्षाचे कार्य करण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशाचे पालन प्रामाणिकपणे करण्याचा मी निर्धार केला आहे. असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यात आम्ही बदल घडवून आणू असे सांगून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.