प्रचाराची पातळी खलावतेय नेत्यांच्या वक्तव्यानं राजकारण गरम !

बीड । निलेश पुराणिक
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाली असून माणुसकी विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या जीवावर उठले असल्याचे पहायला भेटत आहे यामध्ये कधी व्यासपीठावरुन, तर कधी पत्रकार परिषद घेवून तर कधी एखाद्या कॉर्नर बैठकीत इतकेच काय तर आता सोशल मिडीयावरील ट्विटर अ‍ॅप, फेसबुक अ‍ॅप, कधी इंन्स्टाग्राम, कधी व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर चर्चेत राहण्यासाठी किंवा स्टंट म्हणून प्रचार करतांना लोकसभा निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये पहायला मिळत आहे आणि विशेष यामध्ये कोणीही मागे हटायला तयार नाही त्यामुळे या सर्वांचे परिणाम 4 जून रोजी पहायला मिळतील मात्र तुर्तास तरी पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आप-आपल्या नेत्यांचे आक्रमक भाषण, त्या भाषणाचे स्टेटस व्हिडीओ, भाषणाचे व्हिडीओ शेअर व त्यावर भेटणार्‍या लाईक आणि कंमेट्सकडे गेलेले दिसतेय.
यंदाची 18 वी लोकसभा निवडणुक जोरात रंगली असून विविध पक्षाचे नेते एकमेकांवर टिका करुन तर अपक्ष उमेदवार हे आपण किती प्रामाणिक आहोत याचा देखावा करुन जनतेमध्ये जात आहे मात्र यामुळे प्रचाराची दिशा भरकटत असून ती वेगळ्याच दिशेला जाईल याचे तारतम्य कोणीच राखत नाही. आता काही दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर धनुष्यबाणाच्या चिन्हावरुन टिका केली तेंव्हा ते म्हणाले की, जे लोक खान आणि बाण करत होते त्यांचा आता बाण कोठे गेला यावर मग शिवसेनेचे लोक कसे गप्प बसतील यावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी उत्तर देतांना म्हटले की, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खान पाहीजे की बाण पाहीजे?, या घोषणेतून आमचा खानाला नाही तर खान प्रवृत्तीला विरोध होता, असे दानवे यांनी स्पष्ट केले. आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे नाही असे उत्तर दिले होते.
तसेच देशाचे पंतप्रधान यांच्याकडून देखील राजस्थानमध्ये प्रचारा दरम्यान देशात काँग्रेसची सत्ता आली तर ते लोक तुमची संपत्ती, मौल्यवान वस्तू आणि हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्रं जास्त मुलांना जन्म घालणार्‍यांना दिली जातील, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. या विधानावर इंडिया आघाडीकडून टीकाही झाली होती. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मूखपत्र मानल्या जाणार्‍या सामना दैनिकाच्या अग्रलेखातूनही पंतप्रधानांच्या या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे. सामना अग्रलेखात म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी ‘मुसलमान समाजा’विषयी एक धादांत खोटे वक्तव्य केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून मोदी यांनी बांग दिली की, काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. म्हणजे हिंदूंच्या संपत्तीचे वाटप मुसलमानांत केले जाईल. तुमची मंगळसूत्रेही खेचली जातील. अशा पद्धतीचे वक्तव्य करून मोदी यांनी प्रचारात हिंदू-मुसलमान हा मुद्दा आणलाच. मोदींना प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ निवडणूक त्यांना जड जात आहे.
तसेच शरद पवारांकडून देखील मुळ पवार आणि बाहेरुन आलेल्यांमध्ये फरक आहे असे वक्तव्य त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याबाबतीत केल होते त्यामुळे याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नेत्यांकडून वेगवेगळी मिळाली परंतू यामध्ये मंत्री अनिल पाटील यांनी देखील शरद पवार यांच्यावर टिका करतांना म्हटले की, कोणतीही सून आपल्या घरात आल्यानंतर सुनेला लेकीप्रमाणे वागवण्याची आपली संस्कृती आहे असे बोलून टिका केली होती.
तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमरावती येथे नवनीत राणा यांच्या बद्दल बोलतांना देखील नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी ‘नाची’, ‘डान्सर’, बबली अशा शब्दांचा वापर केला या संजय राऊतांच्या उत्तराला नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी देखील उत्तर देतांना म्हटले की, संजय राऊत यांना बाळासाहेबांचे विचार सोडून दहा जनपदवर राहुल गांधींच्या इशार्‍यावर नाचावे लागत आहे.
अशा प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये जसे जसे मतदानाचे टप्पे जवळ येऊ लागले आहेत तसे तसे नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमध्ये वाढ होत आहे. आपल्या नावावर एखादा वाद ओढवून घ्यायचा आणि स्वतःला लाईम लाईटमध्ये आणायचे असा नवीन फंडाच जणू निवडणुक प्रचारामध्ये रुजु होतांना दिसून येत आहे अशा वादग्रस्त वक्तव्याचा फायदा होतो की तोटा हे निकालानंतरच दिसून येईल.

Leave a comment