माजलगाव । निवेदक
मराठा चळवळीमध्ये काम करणार्या ज्या एका समूहाच्या तरुणांवर त्यांचे कोणतेही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नसताना तडीपारची कारवाई केली जाते. हे निंदनीय व चुकीचे असून निवडणुक काळात अशा प्रकारची यापुढे कारवाई करू नये, जी कारवाई केली, ती थांबविली पाहिजे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करून दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाभळगाव घाट (ता. माजलगाव) येथे प्रचारादरम्यान बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे प्रचारासाठी माजलगाव तालुक्यात फिरत आहेत. तालुक्यातील बाभळगाव घाट येथे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या 27 तरुणांवर त्यांनी मराठा आंदोलनात सहभाग घेतला. म्हणून जिल्हा प्रशासनाने तडीपारची कारवाई केली आहे. शासनाने आकस बुद्धीने आणि मराठा समाजाविषयी आकस म्हणून त्यांच्यावर तडीपारची कारवाई केलेली आहे. असा आरोप करीत निवडणुकीत दहशतीचे वातावरण करणे, या गोरगरीब तरुणांच्या घरावर दबाव देणे ही राजनीती तर नाही ना ? असा संशय व्यक्त करीत हे कोण करतंय, का करायला लावतंय असे प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात असे हजारो लोक आहेत, की ज्यांच्यावर अनेक गुन्हे असताना त्यांच्यावर तडीपारची कारवाई होत नाही. आमच्या या तरुणांवर का कारवाई केली जाते. यांच्यावर कोण दबाव टाकतय याची तक्रार निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून करणार असून दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कारवाई झालेल्या तरुणांच्या पाठीशी उभा असून प्रसंगी वेळ पडली तर न्यायालयात देखील जाऊ अशी ग्वाही ही बजरंग सोनवणे यांनी दिली.