राजकीय पक्षांचा घराणेशाहीतील उमेदवारांवरच विश्वास !

राज्याच्या मागील इतिहासातील चित्र

बीडमध्ये काय घडणार याचे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होणार !

बीड । निवेदक
राज्यात लोकसभा निवडणुकीची सर्वत्र लढत होत आहे. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात तसेच पुन्हा तेच आणि पुन्हा तेच वचनं म्हणज पाणी प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न याबाबत निवारण करणार असल्याचे वचन देवून मतदारांच्या भेटी-गाठी होत आहेत त्यामुळे उमेदवारांची वाजंत्री वाजत असल्याचे पाहण्यास भेटत असतांना इतिहासाची पाने चाळली गेली तर मागील निवडणुकांवरुन चित्र स्पष्ट होते की आजपर्यंत राज्याच्या इतिहासाकडे मागे वळून पाहिले असता घराणेशाहीतील उमेदवारांवरच लोकांचा विश्वास असल्याचे दिसून येते तसेच कधी चमत्कार होवून मातब्बर घराणेशाहीतील उमेदवाराला देखील नवख्या उमेदवाराने पराभूत केले आहे बीडमध्ये 2014 नंतर प्रथमच घराणेशाहीतील उमेदवार डॉ.प्रितम मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुक लढवून पहिल्यांदा खासदार झाल्या त्यानंतर त्यांनी 2019 साली निवडणूक लढवून पुन्हा एकवेळ खासदार झाल्या यावेळी बीडमध्ये आणि राज्यात काय पुन्हा घराणेशाहीतील उमेदवार विजयी होतील की नवखे उमेदवार देखील चमत्कार घडवतील याचे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होईल.
बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत 1952 पासून जे कोणी खासदार झाले ते सर्व खासदार हे स्वबळावर संघर्ष करुन राजकारणात स्थिर झाले. राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात मोठ-मोठी पद मिळविली. राज्यात देखील त्यांच्या वारसांनी पुढे चालून त्यांचा वसा आणि वारसा कायम ठेवला. बीडचे पहिले खासदार रामचंद्र परांजपे हे देखील बीडमध्ये नंतर आले त्यांचा जन्म रत्नागिरी शिक्षण पुणे तर पुढे सोलापूरमध्ये काही वर्ष आणि त्यानंतर बीड मधील अंबाजोगाई येथे 17 वर्ष राहिले त्यामुळे बीडकर जनतेने उमेदवार निवडुन देतांना जात-पात-आपला-बाहेरील असा भेदभाव न करता केवळ विकास होईल या अपेक्षेनेच उमेदवार निवडून दिले आहेत. रामचंद्र परांजपे यांच्यापासून 16 व्या लोकसभेपर्यंत बीडमध्ये घराणेशाहीतील कोणतेही खासदार नव्हते. मात्र गड आला आणि सिंह गेला अशी स्थिती 2014 साली बीडकरांसाठी दुर्देवाने झाली कारण स्व.गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि त्यांच्याच कन्या डॉ.प्रितम मुंडे या पुढे पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार झाल्या येथून पुढे त्या 2019 साली पुन्हा खासदार झाल्या या दोन्हीही वेळेस बीडमध्ये घराणेशाहीमधील उमेदवार विजयी झाले होते.
तसेच राज्याच्या राजकारणात 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीतील अनेक उमेदवार उभा राहिले ज्यामध्ये पुनम महाजन (उत्तर मध्य मुंबई) श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, रक्षा खडसे, डॉ.प्रितम मुंडे, सुजय विखे पाटील , धैर्यशिल माने (हातकणंगल) रणजितसिंह निबांळकर (माढा), ओमराजे निंबाळकर या उमेदवारांचा विजयी झालेल्या खासदारांमध्ये समावेश होता.
तर प्रिया दत्त या घराणेशाहीतील असून त्यांना उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाच्या उमेदवार पुनम महाजन ज्या घराणेशाहीमधीलच उमेदवार आहे त्यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता तर उस्मानाबाद (धाराशिव) तेथे राणा जगजितसिंह पाटील हे घराणेशाहीतूनच आलेले उमेदवार होते तेथे त्यांना घराणेशाहीतूनच आलेले ओमराजे निंबाळकर यांनी पराभूत केले होते तसेच नाशिक येथून भुजबळ घराण्यातील समीर भुजबळ हे देखील घराणेशाहीतील उमेदवार होते त्यांना तेथील शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पराभूत केले होते. तसेच राजघराण्यातील उमेदवार निलेश राणे हे 2019 मध्येच रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातून पराभूत झाले होते त्यांना शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभूत केले होते.तसेच मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये असतांना त्यांचा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांनी पराभव केला होता. तर मावळमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली होती तेथे त्यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता.
उपरोक्त चित्रावरुन स्पष्ट होते की, राजकीय पक्षांचा घराणेशाहीतील उमेदवारांवरच जास्त विश्वास आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मतदारांनी नेहमीच जिल्ह्याच्या विकासासाठी बीड मधील राजकीय घराण्यातील उमेदवार किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले उमेदवार निवडून दिले मग त्यात बीड जिल्ह्याचे नववे खासदार म्हणून असलेले बबनराव ढाकणे हे बीडशेजारीच असलेला अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अकोले हे होते.
यंदाच्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्यासमोर प्रमुख आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे असून पंकजा मुंडे या वडिलांमुळे राजकीय घराण्यातील उमेदवार असल्याचे तसेच एकवेळा आमदार तर एकवेळा आमदार होवून कॅबिनेट मंत्रीपदाचा अनुभव त्यांना आहे तर बजरंग सोनवणे हे शेतकरी पुत्र तसेच 2019 ची निवडणूक लढवून 5 लाखाची मते त्यांनी त्यावेळी घेतल्याचा अनुभवाची शिदोरी सोबत आहे त्यामुळे दोघांच्या लढतीमध्ये काय चित्र दिसून येईल हे दि.4 जून 2024 रोजीच स्पष्ट होईल.
बीडमध्ये निवडून येणार्‍या कोणत्याही खासदारापुढे रेल्वेचा प्रश्न, पाणीटंचाईचा प्रश्न, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी थांबवणे, बीड शहरासाठीचे वैद्यकीय महाविद्यालय, एम.आय.डी.सी असे महत्वाची प्रश्न समोर उभी राहतील.
भाजपाने मात्र या लोकसभा निवडणुकीत बर्‍याच ठिकाणी राजघराण्याकडील व्यक्तीला उमेदवारी देण्यात फारसे स्वारस्य दाखविलेले नाही. तसेच यावेळी मात्र राजघराण्यातील उमेदवारावर लोकांचा विश्वास आहे की नाही किंवा राजघराण्याची पार्श्वभूमी नसलेला उमेदवार काही चमत्कार घडवेल याचे चित्र मात्र 4 जून रोजीच स्पष्ट होईल.

Leave a comment