पडघम लोकसभेचे रंग भरले नात्यांचे

भाऊ-बहिण प्रचारासाठी एकत्र, बीडकरांना पहायला मिळणार 15 वर्षापुर्वीचेच चित्र

बीड । निलेश पुराणिक
1996 सालापासून बीडमधील लोकसभेच राजकारण कायम मुंडे या नावाभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळत. 1996 पुर्वी जास्त काळ काँगे्रसची सत्ता आणि 1996 नंतर 2004 चा अपवाद वगळता भाजपानेच येथे बाजी मारलेली दिसत आहे. गेल्या 15 वर्षांत भाऊ विरुद्ध बहिण असा संघर्ष बीडसह महाराष्ट्राला पहायला मिळाला मात्र आता बहिणीसाठी-भाऊ असे चित्र पहायला मिळत असून आजपासून 15 वर्षांपूर्वी याच भाऊ आणि बहिणीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी एकत्र प्रचार केला होता आणि त्यामध्ये मुंडे साहेब विजयी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते हेच डिट्टो चित्र आता बीडकरांना पहायला मिळणार आहे तसेच यावेळी देखील होळीच्या मुहूर्तावर नात्यामध्ये पुन्हा रंग भरले गेले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मात्र विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाचा उमेदवार देखील ठरलेला नाही आणि पंकजाताई मुंडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.
बीड जिल्ह्यात मुंडे, क्षीरसागर, पंडित अशी नावाजलेली मोठ मोठी घराणे आहेत. ज्यांनी राज्याच्या राजकारणात एक वेगळीच छाप पाडलेली आहे. कोणतीही निवडणुक या घरांचे सहकार्य असल्याशिवाय उमेदवाराला सोपी जात नाही असा इतिहास आहे परंतू यावेळी मात्र एक नात्यात गोडवा निर्माण झाल्याची बहिणीसाठी भाऊ तळमळीने काही करत असल्याचे चित्र पहायला मिळत असून ही निवडणूक 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या आठवणीची चुणूक दाखवून देणारी आहे. 2009 साली स्व.गोपीनाथ मुंडे साहेब जेंव्हा प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळी त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्या कारणाने त्यांच्या प्रचाराची धुरा धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी सांभाळली होती आणि यशस्वी देखील केली होती. धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी गावा-गावात, तालुका स्तरावर प्रत्येकाच्या भेटी गाठी घेवून होईल निवडणुकीचा प्रचार केला होता तेच चित्र या निवडणुकीत बीडकरांना पहायला मिळणार आहे परंतू यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांच्यासाठी ओवाळणी व एक ऐतिहासिक विजयाची नोंद घेईल अशी ही निवडणूक असल्याचे सांगून स्वतःच या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतल्याचे सांगून भावाचे कर्तव्य निभावले आहे अशी भावना जनसामान्यत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा उमेदवार अजूनही ठरला नाही. महविकास आघाडीच्या उमेदवारी केवळ अंदाज वर्तविले जात आहेत. कोणता उमेदवार यावरच अडगळी चालू आहेत. शरद पवारांची राजकीय खेळी म्हणजे ताकास तूर न लागू देणे असा प्रकार असतो. महाराष्ट्रात आतापर्यंत त्यांनी उमेदवारी देतांना मोठी गुगली खेळी करत ऐनवेळी आपला उमेदवार जाहीर करतात व त्याला विजयी करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतांत त्यांच्या या डावपेचांना स्व.गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडीच टक्कर देणारी होती परंतू आज मुंडे साहेब देखील नाहीत आणि त्यांचीच कन्या पंकजाताई मुंडे यांच्या मदतीला त्यांचे भाऊ धनंजय मुंडे खंबीरपणे उभे आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी उमेदवार न घोषित केल्यामुळे आजतरी प्रचारात का होईना पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली असल्या बाबतचे चित्र पहावयास मिळत आहे.

Leave a comment