बारामती नंतर बीडमध्ये महिला विरुद्ध महिला?
बीड । निवेदक
लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं असून कधी कोणाला कुठली उमेदवारी मिळेल याबाबत निश्चित सांगता येत नाही. राज्यात काही ठिकाणी भाजपकडून लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, जाहीर झालेल्या यादीवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत यातच बीड सारखी महत्वपुर्ण जागा आणि गेल्या 15 वर्षांपासून राहिलेला अभेद्य बालेकिल्ला जिथे पंकजाताई मुंडे यांना भाजपाने उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या विरुद्ध ज्योतीताई मेटे यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रहाची मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे यासाठी बैठक देखील झाली असल्याची माहिती मिळत आहे.
स्व.श्री.विनायक मेटे यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली होती. तसेच मराठा आरक्षणाचा लढा देखील उभा केला होता आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेणार दिवंगत नेते, आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचे नाव उमेदवारीसाठी आले आहे.
बीडची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन शरद पवार मास्टर स्ट्रोक प्लॅन करण्याची शक्यता आहे. आता महाविकास आघाडीतून ज्योती मेटेंना उमेदवारी जाहीर होणार का? बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे लढत होणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.