19 एप्रिल ते 1 जून 7 टप्प्यात होणार मतदान
बीडचे मतदान 13 मे रोजी
नवी दिल्ली । वृत्तसेवा
देशभरात 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज रोजी देशाचे 25 वे मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार यांच्याकडून घोषणा झाली असून लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहे त्यामुळे देशभरात आचारसंहिता लागली आहे. यंदाचा लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम हा 7 टप्प्यात होणार असून 19 एप्रिल ते 1 जून रोजीपर्यंत मतदान होणार आहे आणि 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार यांनी म्हटले आहे.
पुढे पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्रप्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उडीसा या 4 राज्यात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. तसेच देशभरात 19 एप्रिल रोजी 102 जागेसाठी, 26 एप्रिल रोजी 89 जागेसाठी, 7 मे रोजी 94 जागेसाठी, 13 मे रोजी 96 जागेसाठी, 20 मे रोजी 49 जागेसाठी, 25 मे रोजी 57 जागेसाठी, 1 जून रोजी 57 जागेसाठी असे मिळून एकुण 7 टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात दि. 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपुर येथे मतदान होईल तसेच दि.26 जून रोजी बुलढाणा , अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी येथे मतदान होईल, तसेच दि.7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव,लातूर, सोलापूर, माडा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले येथे मतदान होईल तसेच दि.13.05.2024 रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे मतदान होईल आणि अंतिम टप्पा म्हणजे दि.20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे व मुंबईतील मतदारसंघ येथे मतदान होईल.
देशाची एकुण मतदारांची संख्या 97 कोटी असून यामध्ये सर्वाधिक तरुण मतदार 21.5 कोटी आहेत तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावर्षी 12 राज्यात महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढले आहे. निवडणुक आयोग लोकसभा निवडणुकीवर बारकाईने लक्ष देणार आहे त्यामुळे निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांच पालन करावे असेही मुख्य निवडणुक आयुक्त म्हणाले.आज रोजी सुरु झालेली आचार संहिता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समाप्त होईल.