चारशेपारसाठी भाजपाकडून सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी !

निष्ठावंतांचे तिकीट कापून नवनिर्वाचितांना तिकीट देणे म्हणजे चालत्या गाडीला खीळ

बीड । निलेश पुराणिक
लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी देशभरात सुरु आहे. फक्त निवडणुका जिंकायच्या आणि जनतेला दिलेले आश्वासन विसरायचे या बाबीला काही पक्षांचा अपवाद वगळता तर सर्वांकडून फक्त निवडणुका जिंकायचे कसे असे मनसुबे चालू आहेत. भाजपाकडून 400 पार साठी सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी म्हणजे की सगळा जोर एकवटून एक-एक सत्र करत एका वेळी सतरा योजन दूर म्हणजे 400 पारसाठी मोठी रिस्क घेण्याचा प्रयत्न सुरु आहे म्हणून आजी माजी नगरसेवकांपासून ते आजी माजी आमदारापर्यंत सर्वच नेते कामाला लावून दुसर्‍या पक्षातून आले तरी त्यांना तिकीट दिले जाणार आणि निष्ठावंतांचे तिकीट कापणार? असा मास्टरप्लॅन संभाव्य यादीच्या नावामुळे पहायला मिळत आहे. या संभाव्य यादीमध्ये देशात आणि राज्यात रस्त्याचे जाळे उभा करणारे मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत होते आणि गडकरी प्रेमी भाजपावर नाराज होते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमारे येत राज्यात युतीचे जागा वाटप बाकी आहे असे सांगून विषयाला पुर्णविराम दिला.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. मराठवाड्यात स्व.गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडकडे सर्वांच्या नजरा जास्त लागलेल्या असतात इथे कोणत्या ताई पंकजाताई की प्रितमताई याबद्दल आजही साशंकता आहे कारण नावावर शिक्कामोर्तब झाले नाही आणि बीड जिल्ह्याला लागून धाराशिवमधून शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होईल असे सांगितले जात असतांनाच भाजपाकडून ही जागा नव्याने प्रवेश केलेले बसवराज पाटील यांच्यासाठी मागितली जाते असे सांगण्यात येते.
मराठवाड्यातीलच नांदेड मध्ये आताच काही दिवसांपुर्वी आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची मिनल खतगावकर यांना प्रतापराव चिखलीकर यांचे तिकीट कापून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे तर हिंगोलीमध्ये देखील हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपच्या तानाजी मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता.
अहमदनगर मध्ये देखील सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे असा वाद सुरु असतांनाच निलेश लंके हे अजित पवार गटाकडून उभे राहतील असे सांगण्यात येते सोलापूर मध्ये देखील सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपकडून राज्याचे वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, सातत्याने चर्चेत असणार्‍या माढा लोकसभा मतदारसंघातूनही विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील इच्छूक होते. परंतु, भाजप नेतृत्त्वाने रणजितसिंह निंबाळकर यांच्याच पारड्यात दान टाकले आहे.
कोल्हापूरची जागा सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.सांगलीमध्ये देखील संजयकाका पाटील यांच्याऐवजी काँग्रसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो आणि अमरावती मध्ये नवनीत राणा यांचा भाजपा पक्षप्रवेश होईल. मात्र, नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हेदेखील आग्रही आहेत.
मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री
अजित पवारांना रिस्क घेण्यापेक्षा कमळ चालेल!
वरील नावावरुन असे दिसते की, शिंदे गट आणि अजित पवार यांचा गट यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात जागा जिंकण्याच्या क्षमतेविषयी भाजपाला शंका आहे ही शंका असल्यानेच भाजपाने जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्यासाठी दबाव वाढविला आहे. शिंदे गट व अजित पवारांना देखील कमळ आवडल्याने म्हणजे स्वतःच्या पक्षचिन्हावर लढून मोठी रिस्क घेण्यापेक्षा कमळ सुरक्षित वाटते आणि त्यामुळे पंतप्रधान मोदींशी कनेक्ट होतो आणि मोदी लाटेचा फायदा देखील होतो त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट देखील भाजपाचेच सारे काही ऐकत असल्याचे आजतरी वाटत आहे. परंतू यामुळे चार दिवसात आलेले नेते मोठे होत आहेत आणि निष्ठावंत मागे पडत आहेत.
अजुन पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे त्यामुळे निष्ठावंतांचे तिकीट कापून नवनिर्वाचितांना तिकीट देणे हे अंगलट येण्यासारखे आहे याची दखल भाजपाच्या कार्यकारिणीने वेळेवरच घेतलेली बरी राहील.
भाजपच्या 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक बड्या नेत्यांचा आणि मंत्र्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये नितीन गडकरी यांचे नाव का नाही, असा प्रश्न अनेकांना उपस्थित केला होता. पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने भाजप त्यांचा पत्ता कापणार का, अशी चर्चाही सुरु झाली होती.

पंकजाताईंचा संयमीपणा पुन्हा एकदा सत्तेत नेईल!
पंकजाताई मुंडे हे राज्याच्या राजकारणातील मोठे नाव. स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नंतर त्यांनी संघर्षयात्रा काढून वेगळीच इमेज तयार केली होती त्यांचे राज्यातील 22 पेक्षा जास्त मतदारसंघावर प्रभुत्व आहे हे पक्षश्रेष्ठींना मान्य करावे लागेल परंतू गेल्या 5 वर्षांत या संघर्षकन्येला देखील मोठा संघर्षाचा सामना करावा लागला पंकजाताईंना विधानपरिषदेत डावलले गेले, पुढे प्रितमताईंना मंत्रीपद भेटेल ही अपेक्षा होती तेथेही मुंडे घराण्यावर अन्याय झाला, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार झाल्यावर ताईंना विधानपरिषदेत घेवून मंत्रीपद भेटेल असे अंदाज बांधले जात होते मात्र तसे झाले नाही, त्यानंतर वैद्यनाथ कारखान्यावर केलेली कार्यवाही असे वारंवार अन्याय पंकजाताईंवर आणि मुंडे परिवारावर झाले परंतू ताईंनी संयमीपणा दाखवला पक्ष श्रेष्ठींना देखील संघर्षकन्या काय करु शकते याची जाणीव आहे त्यामुळे त्यांना पंकजाताईंची दखल घेवून त्यांच्याविषयी सहानुभूतीने विचार करुन त्यांना पुन्हा एकदा सत्तेत न्यावे लागेल अन्यथा मराठवाड्यातील मतदार नाराज झाला तर हे भाजपाला परवडणारे नाही.

Leave a comment