मोदींची खात्री; पण प्रितमताई की पंकजाताई नावावरुन साशंकता !

सरकारचा 5 वर्षाचा कालावधी संपत आला । आता सर्वच पक्षांचे राजकीय युद्ध सुरू

बीड । निवेदक
सध्या देशाचे आणि राज्याचे राजकारण पाहता विशेषतः भाजपचे राजकीय डावपेच / खेळ हे क्रिकेटच्या खेळासारखे अनिश्चिततांचा खेळ झाला आहे म्हणून बीड लोकसभा उमेदवारी सध्या तरी कोणाला भेटेल हे सांगणे अनिश्चित झाले आहे. यापुर्वी भाजप-शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट या महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी गेल्या आठवड्यात वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती त्यामध्ये तर अजित पवार यांची राष्ट्रवादी बीडची जागा मागतेय असे सांगण्यात आले होते परंतू रविवारी बीडमध्ये ना.धनंजय मुंडे यांनी महायुतीच्या मेळाव्यात पक्षाचे कर्तव्य आणि भावाची जबाबदारी निभावत ‘ताईच पुन्हा विक्रमी मतांनी खासदार होतील’ असे सांगितले त्यामुळे पुन्हा एकदा ताईच खासदार होतील आणि अजित पवार गट बीडची जागा मागणार नाही हे स्पष्ट व निश्चित झाले असले तरी बीडच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून प्रितमताई मुंडे की पंकजाताई मुंडे या नावावरुन साशंकता आणि मतदारांमध्ये चर्चा निर्माण होत आहे.
सध्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली असून अनेक नेते कामाला लागले आहेत. अनेक नेते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जाण्याला देखील आता वेग येईल याची सुरुवात मिलींद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करुन केली आहे.
अशातच राज्यात सर्वात जास्त चर्चेचा असणारा मतदारसंघ बीड याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. या मतदारसंघात लालकृष्ण आडवाणी, सोनिया गांधींपासून, शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ आहे म्हणून प्रचारा दरम्यान आपले बीड दौरे करत होते.
एका बाजूला लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी आरक्षित व्हावे याकरिता 128 वी घटनादुरुस्ती करुन महिला सशक्तीकरणावर भर देणारे भाजप सरकार यावेळी प्रितमताई यांच्या जागी पंकजाताई यांना तिकीट देणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे असे असतांनाच बीडमध्ये रविवारी ना.धनंजय मुंडे, खा.प्रितमताई मुंडे, अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, आ.प्रकाश सोळंके, आ.आजबे, माजी मंत्री सुरेश नवले,भीमराव धोंडे, राजेंद्र मस्के, अनिल जगताप, कुंडलीक खांडे, सचिन मुळूक इत्यादी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या भाषणा दरम्यान म्हणाले की, ताईच पुन्हा खासदार होणार आणि त्यांना प्रचंड मतांनी आम्ही सर्वजण विजयी करणार असल्याचे सांगितले मात्र नेमकी ताई कोणत्या असे नाव न घेतल्याने प्रितमताई की पंकजाताई न कळल्यामुळे नागरिकांत साशंकता निर्माण झाली आहे.
खा.प्रितम मुंडे या देखील बीड मतदारसंघापेक्षा मुंबईत राहणेच पसंत करत असतात तसेच पीकविमा अग्रीम, सतत पडणारा दुष्काळ, ऊसतोड कामगारांचे प्रश्न असे प्रमुख प्रश्न जैसे थे असल्याने आणि विशेषतः बीड जिल्हा वासियांसाठी असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बीड रेल्वेचा प्रश्नाबाबत होत असलेले धिम्या गतीने काम या सर्व कारणामुळे खासदार प्रितम मुंडे यांच्यासाठी देखील ही निवडणुक मोठे आव्हान असेल असे नाही परंतू वाट्टेल तितकी सोपी देखील नसणार आहे.
सध्याच्या लोकसभेमध्ये भाजपकडून 5 महिला खासदार झालेल्या आहेत त्यामध्ये डॉ. प्रितम मुंडे, रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार यांचा समावेश आहे. दबंग खासदार असलेल्या प्रितम मुंडे या भाजपाच्या महिला खासदारांमधून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याची देखील नोंद त्यांच्या नावावर आहे.
देशात पहिल्यांदाच भारतीय नौदलाच्या जहाजावर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर प्रेरणा देवस्थळी यांची नेमणूक करणारे भाजप, महाराष्ट्रात सत्तेत असणारे भाजप ज्यांनी राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना नियुक्ती देणारे भाजप, महिलांसाठी महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात पास करणारे भाजप, महिलांसाठी 26 आठवडे मातृत्वाची रजा देणारे भाजप, बेटी बचाव, बेटी पढाव सारखी योजना राबविणारे भाजप, सरकारी आकडेवारी नुसार 10 कोटी एलपीजी गॅस देणारी भाजप, 3 कोटी महिलांना घरे देऊन महिला सशक्तिकरणावर भर देणारे भाजप यावेळी काय भूमिका घेईल याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment