क्रिकेटलाच महत्व का

इतर खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास आपणच कमी पडतो ?

विविध खेळांमध्ये निपुणता दाखवून जागतिक पातळीवर देशाचे नाव गौरान्वित करणार्‍या निवडक खेळाडूंची दरवर्षी अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यंदा देशातील 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, तर 5 क्रीडा प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मंगळवारी राष्ट्रपती भवनात हा समारोह पार पडला. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले, ज्याची छायाचित्रे वर्तमानपत्रांतून आणि वृत्तवाहिन्यांतून झळकली. राज्यातील बहुतांश वृत्तपत्रांनी यासंबंधी वृत्त देताना केवळ मोहम्मद शमी याचेच पुरस्कार घेतानाचे छायाचित्र प्रकाशित केले. बहुतांश वृत्तपत्रांत मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार मिळाल्याच्या शीर्षकाअंतर्गत बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या अखेरीस पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने केलेल्या चमकदार कामगिरीचे कौतुक प्रत्येक भारतीयाला आहे. मात्र क्रिकेटला लाभलेल्या अवास्तव ग्लॅमरमुळे इतर खेळ झाकोळले जात आहेत हे सत्य नाकारता येणार नाही. देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे याशिवाय अनेक खेळ भारतात खेळले जातात आणि त्या खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारे खेळाडूही भारतात आहेत; मात्र क्रिकेट या खेळाला लाभलेले वलय आणि त्याविषयी भारतीयांमध्ये असलेली अवास्तव क्रेज इतर खेळांच्या बाबतीत औषधालाही दिसत नाही. क्रिकेट खेळात ज्याप्रमाणात आर्थिक उलाढाल होते, खेळाडूंना ज्या प्रमाणात पैसा आणि प्रसिद्धी मिळते त्या तुलनेत अन्य खेळातील खेळाडूंना मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी याला नखाचीही सर नाही. त्यामुळे यंदा अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 2 खेळाडू होते याचाही राज्यातील बहुतांश प्रसिद्धीमाध्यमांना विसर पडला. काहींनी पुरस्कार घेतानाचे छायाचित्र केवल मोहम्मद शमीचे टाकून बातमीमध्ये अर्जुन पुरस्कार विजेते तिरंदाज सातार्‍याची आदिती स्वामी आणि नागपूरचा ओजस देवतळे यांचा केवळ ओझरता उल्लेख केला. मुंबईचे विख्यात मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांना यंदाचा मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला मात्र त्यांचेही पुरस्कार घेतानाचे छायाचित्र कुठे दिसले नाही. जागतिक स्तरावर आयोजित केलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत दरवर्षी भारताला केवळ 2 ते 3 पुरस्कारांमध्ये समाधान मानावे लागते. त्यावेळी आपल्यासह अनेक भारतीयांना वाईट वाटते; मात्र या स्पर्धेत भाग घेणार्‍या खेळाडूंना आणि त्यांच्या खेळांना पुरेसे प्रोत्साहन देण्यास आपणच कमी पडतो याचा विचार आपण केव्हा करणार ?
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई

Leave a comment