एका दिवसाच्या बाळावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया : बीड जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांचा दुर्मिळ पराक्रम

बीड । लक्ष्यवेध प्रतिनिधी
जिल्हा रूग्णालयातील सेवेवर अनेकदा शंका घेतली जाते, मात्र बीड जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या कौशल्याने आणि समर्पणाने या विश्वासाला नवी दिशा दिली आहे. बीड येथील मोमीन मुन्नवर यांच्या एका दिवसाच्या बालिकेवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून, जिल्हा रूग्णालयाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे.
दि. 6 ऑक्टोबर रोजी आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. त्यात दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला – एकीचे वजन 2.3 कि.ग्रॅ. तर दुसरीचे 1.8 कि.ग्रॅ. होते. मात्र कमी वजनाच्या बाळाच्या हृदयात दोन ते तीन छिद्र असल्याचे तसेच हृदयातील नसा उलट्या झाल्याचे निदान सिव्हील हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी केले.
तत्काळ बाळाला एनआयसीयू विभागात दाखल करून टूडी-ईको चाचणी करण्यात आली. त्यानंतर पॅराडाईज हॉस्पीटलचे डॉ. सिद्दीक आणि अ‍ॅपेक्स हॉस्पीटलचे डॉ. इजहार जावेद यांच्या सल्ल्याने बाळाला मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी तातडीने 108 रूग्णवाहिकेची व्यवस्था करून बीड ते मुंबई मार्गावर सलग पाच अ‍ॅम्बुलन्स सज्ज ठेवल्या.
दि. 7 ऑक्टोबर रोजी बाळाला मुंबईतील नारायणा हेल्थ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. सुप्रतिम सेन यांनी बीडच्या डॉ. इलियास खान आणि डॉ. सिद्दीक यांच्याशी चर्चा करून ‘इरश्रश्रेेप रीींळरश्र डशिीेीींेाूं (खच्)’ ही गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
शस्त्रक्रियेचा अंदाजे खर्च 1 लाख 65 हजार रुपये होता. मात्र शासन योजना आणि हॉस्पीटल एनजीओच्या मदतीमुळे मोमीन कुटुंबाला सवलत मिळाली आणि फक्त 70 हजार रुपयांत बाळाची शस्त्रक्रिया पूर्ण झाली.
सध्या जुळ्या मुली आणि आई तिघीही सुखरूप आहेत. पुढील दुसरी शस्त्रक्रिया बाळाचे वजन वाढल्यानंतर दिड महिन्यानंतर करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रयत्नांमध्ये डॉ. संजय राऊत, डॉ. इलियास खान, तसेच जिल्हा रूग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय व प्रशासनिक टीमने सातत्याने पाठपुरावा केला. महसूल विभागातील नायब तहसीलदार हजारे आणि जन्म नोंदणी विभागाने अत्यंत अल्प वेळात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मोठा हातभार लावला.
या घटनेमुळे जिल्हा रूग्णालयातील सेवांबद्दल जनतेचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे आणि बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात ही कामगिरी सुवर्ण अक्षरांनी नोंदवली जाईल, असे निश्चित आहे.

Leave a comment