बीड शहरातील सर्व पेट्रोल पंपांची कसून तपासणी करावी नागरिकांची मागणी

बीड । प्रतिनिधी ः-बीड शहरातील जालना रोडवरील जाधव पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंपावरून पेट्रोल घेतल्यानंतर वाहनांची गाडी बंद पडत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित तक्रारींची गंभीर दखल घेत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी एक विशेष पथक घटनास्थळी पाठवून पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ असल्याची खातरजमा केली.
पडताळणीत भेसळ स्पष्ट
प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत संबंधित पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे स्पष्टपणे आढळून आले. यानंतर पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच गोंधळ घातला. अशा पद्धतीने फसवणूक करून वाहनांचे नुकसान करणार्या पंपावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली.
करण लोंढे यांनी उघड केला प्रकार
युवा नेते करण लोंढे हे पेट्रोल भरण्यासाठी संबंधित पंपावर आले असता, त्यांनी पेट्रोलमध्ये काहीतरी गडबड असल्याचे लक्षात घेतले. लगेचच त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ कारवाईची मागणी केली. तहसीलदारांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने पथक पाठवून घटनेची पडताळणी केली व भेसळयुक्त पेट्रोल असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांमध्ये करण लोंढे यांची तत्परता आणि दक्षता वाखाणण्याजोगी आहे असे मत व्यक्त केले जात आहे.
बीड शहरातील सर्व पेट्रोल पंपांची कसून तपासणी करावी नागरिकांची मागणी
या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आठवड्याभरापूर्वीच शहरातील दुसर्या एका पेट्रोल पंपावरही पेट्रोलमध्ये पाणी आढळल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे आता नागरिक जिल्हाधिकारी, डीएसओ अधिकारी, कायमापन विभाग व संबंधित तेल कंपनीकडे मागणी करत आहेत की, बीड शहरातील सर्व पेट्रोल पंपांची कसून तपासणी करावी व दोषी पंपधारकांवर कठोर कारवाई करावी.
काटा मारणे व आकडेवारीत गडबड – इतर तक्रारीही समोर
पेट्रोलमध्ये भेसळ असण्यासोबतच काटा मारणे, मीटरमध्ये तफावत व बिल न देणे यासारख्या इतर तक्रारीदेखील नागरिकांनी मांडल्या आहेत. राम लोंढे, दिपक कांबळे,गजानन डोंगरे, संतोष औटी, निलेश चौधरी, परदेशी गणेश सुंदरसिंग, श्रीवल्लभ विजयकुमार जाजू, गुरखुदे ईश्वर, विशाल भानुदास शेजाळ आदी नागरिकांनी पेट्रोल पंप कर्मचारी ग्राहकांची आर्थिक फसवणूक करतात, यावर देखील नियंत्रण ठेवावे व कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. आता संबंधित पेट्रोल पंपावर तेल कंपनी, जिल्हा प्रशासन, डीएसओ अधिकारी, व कायमापन विभाग कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसावा यासाठी प्रशासनाने चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.