ट्रॅव्हल्स पुन्हा शहरात उभ्या राहू लागल्याने नागरिकांना त्रास

बीड (प्रतिनिधी)-बीड शहरात वाहतुक कोंडी नियोजन नसल्यामुळे नित्याचीच झाली आहे. काल दि.26 फेब्रुवारी 2025 रोजी शिवरात्रीला प्रचंड ट्राफिक जाम होवून कंकालेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. दर्शनासाठी ये-जा भाविकांना देखील याचा सामना करावा लागला यावेळी पोलीसांकडून कोणतेच नियोजन झालेले दिसून आले नाही त्यामुळे पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी दुर्लक्ष केल्याने शिवरात्रीच्या दिवशी देखील ट्राफीक जामचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
याबाबत माहिती अशी की, वाहनधारकांची मनमानी त्यांच्या ट्राफिक पोलीसांचा कसलाही धाक नसल्याने बीड शहरात गाडी चालवणे जिकरीचे होवून बसले आहे. सततची वाहतुक कोंडी ही शहरवासियांची डोकेदुखी बनत आहे. वाहतुक पोलीसांकडून कुठलेही नियोजन सणावाणाच्या दिवशी, जयंतीच्या दिवशी देखील होत नसल्याने नागरिकांना मार्गक्रमण करतांना प्रचंड त्रास होत आहे. काल कंकालेश्वर मंदिर परिसरात ट्राफिक जाम असतांना पोलीसांनी अगदी मंदिराजवळ वाहने पार्कींग सांगितले. सदरची वाहन पार्कींग देखील एका रांगेत नसल्याने अस्तव्यस्त असल्याने ये – जा करणार्या नागरिकांना याचा त्रास झाला. तसेच गर्दीमध्ये मोठी वाहने येवू दिल्याने वाहतुक कोंडीमध्ये अधिकच भर पडत होती. बेशिस्त वाहन पार्कींग ,विरुद्ध दिशेने प्रवास यामुळे काल ट्राफिक जाम होती पोलीसांनी मात्र उशिरा लक्ष दिले व ट्राफिक हटवण्याचा प्रयत्न केला यामुळे दर्शनासाठी ये-जा करणार्या पायी चालणार्या भाविकांना देखील याचा प्रचंड त्रास झाला.
तसेच जालना रोड रस्ता बांधकामावेळी साईडपंखे न भरल्याने मोठ्या रस्त्याचा छोटा रस्ता झाला आहे त्यातच या ठिकाणी ट्रॅव्हल्स उभी राहिल्याने नागरिकांना वाहन चालवण्यास त्रास होतो. बीडमध्ये वाहतुक कोंडीमध्ये मोठे योगदान म्हणजे रस्त्याचा अभाव हे स्पष्ट आहे त्यातच साईडपंखे सोडून रस्त्यावर उभी राहिलेल्या वाहनांमुळे रस्ता छोटा होवून वाहतुक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे याकडे पोलीस अधिक्षक व वाहतुक शाखेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.