पुन्हा एकदा नगरपालिकेने शहरात बुलडोझर फिरवला

बीड (प्रतिनिधी) बीड नगरपालिकेने दि. 12 फेबु्रवारी बुधवार रोजी शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तसेच हातगाड्यांवाल्यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यास काय होते याचा एकवेळ दणका दिल्यानंतरही काही महाशयांनी नियम पाळलेले नव्हते त्यामुळे आज पुन्हा एकदा नगरपालिकेने शहरातील सुभाषरोडवरील हातगाडे, ओटे, पत्र्याचे शेड काढले त्यामुळे आज शहरातील सुभाष रोड, भाजी मंडई परिसरातील हातगाडयावाले, फुलावाले, आदर्श मार्केटमधील दुकानदारांनी आपापल्या दुकानांसाठी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण मागे सरकवण्याचे चित्र पहायला मिळाले.
सार्वजनिक रस्ते हे सरकारची मालमत्ता आहे ही बाब माहिती असतांना देखील प्रत्यक्षात कार्यवाहीला उशिरा सुरुवात केल्यानंतर बीड नगरपालिकेकडून गेल्या 11 दिवसांपासून कार्यवाही सुरु असून ज्यामध्ये बीड शहरातील जालना रोडवर, सुभाषरोड, नगर रोडवरील दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, चहाचे गाड्यावाले, टपर्‍यावाले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसृष्टीजवळील ब्रेकफास्टचे गाडे या सर्वांचे अतिक्रमण काढून रस्त्यांना मोकळा श्वास घेवू दिला त्यामुळे बीड शहरातील रस्ते मोठे वाटू लागले आणि वाहने व नागरिकांना जाण्यासाठी रस्ता सुलभ झाला परंतू नगरपालिकेने याकडे कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणीप्रमाणे अतिक्रमणधारक पुन्हा अतिक्रमण करतात त्यामुळे यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे अशी मागणी नागरिकातून होत आहे.
तसेच आता जिल्हा वाहतुक पोलीस शाखेकडून कार्यवाहीची अपेक्षा नागरिक बाळगून असून रस्त्यावर उभे राहिलेले अ‍ॅटो, रात्रीच्या वेळी बस स्टॅण्डसमोर उभे राहणार्‍या ट्रॅव्हल्स, जिल्हा परिषदसमोरील वाहने, सुभाष रोडवर एका बाजूला उभी राहिलेली वाहने यांच्यावर कार्यवाही करुन त्यांनी पुन्हा नियमाचे उल्लंघन करु नये यासाठी पोलीसांनी देखील मोहीम हाती घेतली पाहिजे अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.
मोठा रस्ता अर्धवट बांधकामामुळे छोटा झाला
बस स्टॅण्डसमोरील जालना रस्त्यावरील साइड पंखे पहिलेच भरावयाचे राहिले आहेत त्यात रस्त्यावर रिक्षाचालक उभे राहिल्याने रस्ता आणखीनच छोटे वाटू लागला त्यामुळे लोक म्हणू लागले की मोठा रस्ता अर्धवट बांधकामामुळे छोटा झाला अन् रिक्षाचालकाचा त्रास वेगळा त्यामुळे अशा नियम न पाळणार्‍या रिक्षाचालकांवर कार्यवाही जिल्हा वाहतुक शाखेने करावी अशी मागणी होत आहे.

Leave a comment