नगरपालिका प्रशासन जागे झाले अन् सकाळी सकाळी अतिक्रमण काढले

बीड (प्रतिनिधी)-नागरिकांना वेळेवर पाणी न देण्यापासून सर्वच ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले नगरपालिका बीड नगरपालिका प्रशासन अचानक जागे झाले आणि सकाळी सकाळी शहरातील नगर रोड, जालना रोडवर या मुख्य रस्त्यावर थाटलेल्या टपर्‍या, पत्र्याचे शेडवर जेसीबीच्या सहाय्याने कार्यवाही करुन रस्ते मोकळे केले त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला मात्र नगरपालिकेने केलेल्या या कार्यवाहीने नागरिक मात्र अवाक झाले होते.
आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एलआयसी ऑफीसच्या परिसरापासून दुकानदारांची पुढे आलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली यामध्ये दुकाने, टपर्‍या, शेड अस्तित्वात होते ते जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले.
तसेच बस स्टॅण्ड समोरील टपर्‍यांवर कार्यवाही करण्यात आली. शिवसृष्टीसमोर उभी राहणारी नाश्त्याची गाडे आज दिसली नाहीत.
नव्याने होत असलेला बीड-अहिल्यानगर हा रस्ता अतिक्रमणाने पुन्हा व्यापू लागला होता परंतू आज नगरपालिकेने कार्यवाही केल्याने तो रस्ता मोकळा दिसू लागला होता त्यामुळे पालिकेने केलेल्या या अतिक्रमणाच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांत समाधान दिसू लागले आहे.
अतिक्रमण होवूच नये यासाठी पथक नियुक्ती करुन नजर ठेवणे आवश्यक
बीड नगरपालिकेने या अगोदरही अनेकदा अशी कार्यवाही केलेली आहे परंतू पहिले पाढे पंचावन्न होते म्हणजे काही दिवस उलटले की पुन्हा टपर्‍या, शेड, मुख्य रस्त्यावर उभी राहतात त्यामुळे एखादे पथक नियुक्ती करुन नजर ठेवणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.

Leave a comment