आ.क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी मात्र अस्तित्वपणाला लावणारी निवडणुक
जनतेत चर्चा!
बीड । निलेश पुराणिक
महाराष्ट्र राज्याची 15 वी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून बीड विधानसभा मतदारसंघ 230 हा राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय राहिलेला आहे. यावेळी बीड मतदारसंघात प्रमुख लढत ही विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे डॉ.योगेश क्षीरसागर आणि अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांंच्यामध्ये होत असल्याची चर्चा शहरातील नागरिकात पाहावयास मिळत आहे.
राज्यभरात सर्वात उशिरा बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महायुतीने आणि महाविकास आघाडीने घोषित केल्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघातील लढत आणखीनच चुरशीची झाली आहे. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे डॉ.योगेश क्षीरसागर आणि अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांच्यामध्येच ही निवडणुक होत असल्याचे शहरातील नागरिक लक्ष्यवेधशी बोलतांना सांगत आहेत.
आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या 5 वर्षात काय कामे केली त्याचा लेखाजोगा घेवून ते मतदारात जातील तसेच डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड नगर पालिकेच्या माध्यमातून काय कामे केली हे ते मतदारांना पटवून देतील परंतू नागरिकांचे समाधान यामधून होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण बीड शहरात अद्याप देखील पाणीप्रश्न गंभीर आहे त्यामळे नागरिकांत नाराजी आहे तसेच पुरेशा आरोग्य सुविधा देखील नाहीत मेट्रोसिटीमध्ये उपचाराकरीता आजही लोकांना जावे लागते तसेच शहरातील खड्डेमय रस्ते, बंद पडलेले सिग्नल, उद्यानाची उणिव, बेरोजगारी या बाबींची पुर्तता न झाल्याने नागरिक असमाधानी आहेत याबाबत आ.संदीप क्षीरसागर व डॉ.योगेश क्षीरसागर लोकांचे कसे समाधान करतात शिवाय डॉ.योगेश क्षीरसागर यांना त्यांच्या पक्षातील नाईकवाडे, पटेल, गवते हे सहकार्य करतील का याचे मोठे टेन्शन आहे.
दुसरीकडे अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांनी राजकारणाला सुरुवात केल्यापासून राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आणि मध्यरात्री देखील जनतेच्या कामाला धावून गेल्यामुळे जनतेत पोहोंचलेले नेतृत्व आहे तसेच त्यांना सर्व समाजातून मोठा पाठिंबा आहे तसेच मराठा आंदोलनाच्या वेळी समाजासाठी केलेले कार्य आणि माजीमंत्री सुरेश नवले यांनी माघार घेवून अनिल जगताप यांना दिलेला पाठिंबा या सर्वच अनिल जगताप यांच्या जमेच्या बाजू असल्याने तसेच सत्ता नसतांना देखील लोकांचे प्रश्न शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न केल्याने जगताप यांच्यासाठी कुणी आव्हान नाही, अनिल जगताप यांच्यासाठी आमदारकीचा मार्ग सरळ आणि सोपा आहे अशी चर्चा नागरिकांत होतांना दिसून येत आहे.