
बीड (प्रतिनिधी)- 2017 सालापासून बेपत्ता असलेला खलवट लिंबगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाचा मुलगा राजू काकासाहेब माळी अखेर 7 वर्षांनंतर शोधून काढण्यात आला आहे. या यशामागे मुलाचे आई-वडील आणि एकलव्य भिल्ल समाज संघटना, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अॅड. सूर्यकांत पवार यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले.
राजू माळी हा 2017 मध्ये शाळेतून अचानक बेपत्ता झाला होता. त्या वेळपासून त्याच्या कुटुंबाने अनेक वेळा प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. शालेय प्रशासन आणि स्थानिक अधिकार्यांकडूनही असहकार मिळाल्याने मुलाच्या पालकांनी संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड. सूर्यकांत पवार यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अॅड. पवार यांनी संबंधित जबाबदार सांभाळ करणारांविरोधात तक्रार दाखल करून कार्यवाही सुरू केली. त्यानंतर बीड येथील धाडसी पथक – मानव तस्कर विरोधी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव मॅडम यांनी सदर प्रकरणाचा तपास हातात घेतला. तपासाच्या आधारे, अखेर 7 वर्षांपासून बेपत्ता असलेला राजू शोधून त्याला आई-वडिलांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.
या संवेदनशील क्षणी पीएसआय पल्लवी जाधव, अॅड.सूर्यकांत पवार आणि त्यांच्या सहकार्यांची उपस्थिती होती. राजूला पुन्हा मिळाल्यामुळे कुटुंबाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले.
या घटनेनंतर आदिवासी समाजात एक दिलासादायक भावनिक लहर निर्माण झाली आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी अशा संघटनांचे योगदान हे अत्यंत मोलाचे असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.