श्रीराम मंदिराच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट
नवी दिल्ली । वृत्तसेवा
सध्या सर्वांचे लक्ष अयोध्येतील राम मंदिरात होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं येत्या 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी केंद्र सरकारची सर्व कार्यालयं अर्धा दिवस बंद राहणार आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सात दिवस आधी, म्हणजे 16 जानेवारीला अयोध्या मंदिर परिसरात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या आधी दररोज विशिष्ट विधी केले जात आहेत. 22 जानेवारीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आसाम, छत्तीसगड या राज्यांत 22 जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. आता केंद्र सरकारनं सरकारी कार्यालयं बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
श्रीराम मंदिराच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकीट आणि जगभरातील प्रभू रामावर जारी केलेल्या टपाल तिकिटांचे पुस्तक प्रसिद्ध केले. यावेळी पीएम मोदी यांनी राम, सीता आणि रामायण यांची महानता काळ, समाज, जात, धर्म आणि प्रदेशाच्या सीमांच्या पलीकडे आहे. ते सर्वांना जोडतात, असे म्हंटले आहे.
आतापर्यंत श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.