हिरमुसलेला निसर्ग ; वैराण मराठवाडा!

अग्रलेख

कधीकाळी आबादी आबाद असलेला मराठवाडा जेथे बारामाही वाहणार्‍या नद्या असायच्या यामध्ये मुख्य नदी आणि देशाची दुसरी गंगा समजली जाणारी गोदामाई अर्थात गोदावरी देखील सध्या काही ठिकाणी कोरडी तर काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे आणि वाळुउपशामुळे खड्डेमय व त्यामुळे जलमय दिसते त्यानंतर बीड जिल्ह्यातील सिंधफणा, बिंदुसरा, गेवराईतील विद्रुपा नदी, मांजरा नदी, तर छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या, जालना येथे कुंडलिका नदी व तिच्या उपनद्या, धाराशिव येथे सीना नदी आणि तिच्या उपनद्या, नांदेड येथे गोदावरी नदी व मांजरा नदी आणि त्यांच्या उपनद्या, लातूर येथे तेरणा नदी व तिच्या उपनद्या, परभणी येथे पुर्णा आणि गोदावरी नदी व त्यांच्या उपनद्या आणि हिंगोली येथे कयाधू नदी या महत्वपुर्ण नद्या मराठवाड्याच्या जलवाहिनी आहेत त्यांची आजपासून मागे 25 वर्षांची स्थिती म्हणजे बारामाही पाणी या नद्यांना असायचे परंतू हल्ली अलीकडे सारखेच निसर्ग मनुष्याच्या अति केलेल्या कृत्यावर रागावतोय म्हणजे हिरमुसलेला निसर्ग आणि त्याचे फळ भोगणारा वैराण मराठवाडा असेच म्हणणे योग्य राहील.
मागे काही वर्षांपुर्वी सर्वात जास्त वृक्षतोड ही मराठवाड्यात आहे त्यातही बीड जिल्हा अव्वल होता तसेच टँकरचा रेकॉर्डही महाराष्ट्रात सर्वात जास्त टँकर मराठवाड्यात आहेत आणि बीड जिल्ह्यात सर्वात जास्त चालविले जातात अशी नोंद होती बीड जिल्ह्यात पाडळसिंगी येथे टँकर बनविण्याचेच केंद्र सुरु झाले आहे ही देखील अभिमानाची नाही तर लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. तसेच जंगलतोड, वृक्षतोड याचा रेशिओ हा बीड जिल्हा आणि मराठवाड्यात मोठा असतो तर वृक्षलागवडी रेशिओ मात्र अल्पशः असतो ही दुर्देवाची नोंद बीड जिल्ह्याच्या नावावर आहे मग निसर्ग कोपणार नाही तर काय करणार? हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही.
मागे नाम म्हणजे अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळ हटविण्यासाठी चांगला प्रयत्न केला होता त्याचे काय झाले पुढे याचे काही वृत्त नाही तसेच अनेक संघटना, नेत्यांचे वाढदिवस हे वृक्षलागवड करुन घेतली जातात मात्र त्या झाडाची 2 वर्षे तरी काळजी घ्यावी अशी जबाबदारी कोणी घेत नाही त्यामुळे देखाव्या पुरता शो केला जातो आणि त्याची फलश्रुती ऊन वाढणार, तापमान वाढणार, यंदा पाऊसही कमी पडणार, दुष्काळाची दाहकता अशा कित्येक मथळ्याखाली वर्तमानपत्रामध्ये बातम्या झळकतात यास मुळ कारण माणुसच आहे त्यामुळे एखादी जबाबदारी घेतली तर ती पुर्ण निभवावी अर्ध्यातून सोडू नये या कर्तव्याची जाण करुन देणारा देखील नेता पुढारी असायला हवा परंतू तसा कोणी नेता भेटत नाही आणि यामुळे दिवसेंदिवस हिरमुसलेला निसर्ग आपल्या रागाचा पारा आणखीनच वाढवतोय.
अमुक अमुक भागात बिबट्या दिसला, तमुक तमुक भागात व्याघ्र दर्शन झाले नागरिक भयभीत अशा बातम्या पहायला मिळतात यास कारणही आपण आहोत कारण ते आपल्या घरात आले नाही तर दिवसेंदिवस मनुष्य प्राण्याची वस्ती इतकी वाढतेय की त्याला आता जंगलही कमी पडू लागलेत मग बिचारे प्राणी तरी काय करणार? ते त्यांचे जंगलात राहत होते, ते अगोदरच मांसाहारी होते, ते जंगलात राहून प्राणी खाऊन राहत होते आता जंगलापर्यंत माणसाची वस्ती गेल्याने प्राण्यानंतर माणसांचा नंबर लागू लागला आहे. यावर स्वतःला आवरायला हवं. माणसाने स्वतःदेखील निसर्गाचे काहीतरी देण आहे याची जाणीव राखायला हवी एक झाड लावले तर त्याला किमान 02 वर्ष सांभाळा ते पुढे आपल्याला 100 वर्षे सांभाळेल यासाठी प्रयत्न करावेत, पाणी बचत करण्यासाठी घरातील नळाचे गळके पाईप पासून ते नगर पालिकेच्या वॉल फिटींगपर्यंत पाणी गळणार नाही याची काळजी घ्यावी. नद्या स्वच्छ राहतील यासाठी प्रयत्न करावेत असे झाले तरच कुठे दुष्काळाची दाहकता काहीसी कमी होईल व धनधान्याची विपुलता, समृद्धी पुन्हा नांदेल यात काडीमात्र ही शंका नाही!

Leave a comment