स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप

मुंबई । निवेदक
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये झालेल्या सोहळ्यात गुरूवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 चे निकाल आज जाहीर झाले. त्यात महाराष्ट्राने पहिल्यांदाच इतर राज्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. देशात इंदूर आणि सुरत या शहरांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार राज्यातील नवी मुंबई महानगरपालिका, सासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगरपालिकांना प्राप्त झाले आहेत. नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहरांत सेव्हन स्टार मानांकनासह आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.

Leave a comment