बीड । निवेदक
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ज्ञानराधा पतसंस्थेच्या व्यवहार आणि सर्व शाखा बंद होत्या, तसेच ग्राहकांना वेळेवर पैसे न मिळाल्याने त्यांची आर्थिक अडचण वाढत होती यानंतर शासन दरबारी तक्रारी, आंदोलने झाली त्या-त्यावेळी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे यांनी व्हिडीओद्वारे समोर येत पैशाची व्यवस्था करतो विश्वास ठेवा, थोडे सहकार्य करा अशी विनंती केली आणि सुरेश कुटेंनी आज 5 मार्च रोजी दिलेला शब्द निभावत आरटीजीएस प्रणालीद्वारे ग्राहकांचे पैसे परत करायला सुरुवात केली आहे त्यामुळे भांड्यात पडलेला ग्राहकांच्या जीवात जीव आला असून त्यांच्या चेहर्यावरील आनंद आजही कुटे परिवारावर विश्वास असल्याची जाणीव करुन देत होता.
बीडमध्ये सर्वप्रथम जिजाऊ मॉसाहेब, परिवर्तन, मातोश्री, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेट अशा पतसंस्थांचे व्यवहार एकामागोमाग एक ठप्प झाल्याने ग्राहकांचा जीव भांड्यात सापडला होता यामध्ये काही संस्थाचालक आणि संचालक मंडळ यांनी ठेवीदारांचा पैसा हा प्लॉटींग, शेअर मार्केट, आपापले व्यवसाय डेव्हलप करण्यावर गुंतवला असल्याचे चित्र पहावयास मिळाले तसेच काही संस्थाचालकांनी विनातारण कर्जे वाटली. नातेवाइकांच्या नावावर स्वत: कर्जे उचलली त्यातून वसुलीचा प्रश्न गंभीर बनला. एनपीए थकबाकीचे प्रमाण वाढले. संस्था अडचणीत आल्या, त्यामुळे जिजाऊ मॉसाहेब, परिवर्तन, मातोश्री, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेट अशा नावाजलेल्या पतसंस्थामधून ठेवीदारांचा हक्काचा पैसा त्यांना परत मिळेना झाला त्यामुळे सर्वच पतसंस्था चालकांच्या विरोधात पोलीस तक्रारी, त्यांच्या विरोधात आंदोलने, शासन दरबारी तक्रारी, इतकेच काय तर पालकमंत्री यांच्याकडे देखील तक्रारी देण्यात आल्या परंतू शांत, संयमी सुरेश कुटेंनी या सर्व परिस्थितीला सामोरे जावून आज पासून ग्राहकांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे ग्राहकांचा आज तरी कुटे परिवारावर विश्वास कायम असल्याचे चित्र पहावयास मिळते.
दुर्देवाची बाब म्हणजे इतर पतसंस्थांकडून अजून एकही रुपया न मिळाल्याने बीडकर आणि बीड जिल्ह्यातील ग्राहक मात्र चिंतेत आहे कारण एखाद्या पतसंस्थेला कायमचं टाळं लागल्यावरच ती बुडल्याचं ठेवीदारांना समजतं ही या क्षेत्रातील परिस्थिती आहे. पतसंस्थेतील ठेवींवर बँकेतील ठेवींवर असलेले विमा संरक्षण देखील नाही. आजही पतसंस्थेतील ठेवी बुडालेले ठेवीदार हतबल आहेत ना कायदा त्यांना मदत करत ना व्यवस्था.
एकंदर ज्या उदात्त हेतूने आणि आलिशान वाहनांमधून फिरणार्या आणि समाजात नावारूपाला आलेल्या प्रतिष्ठित संचालकांवर विश्वास ठेवून ठेवीदारांनी आपला पैसा पतसंस्थेत जमा केला होता त्या विश्वासाला तडा गेला आणि पतसंस्था चालकांच्या स्वाहाकारी प्रवृत्तींन ठेवीदारांच्या स्वप्नाचं वाटोळं करून टाकलं आहे. तसेच लोकांमधून कायमचा विश्वास पतसंस्थेचे संचालक गमावून बसले आहेत कुटे मात्र याला अपवाद ठरले आहेत.