सिंहद्वारामधून राम मंदिरात प्रवेश

सिंहद्वार येथून 32 पायर्‍या चढून भाविकांना मंदिरात प्रवेश

अयोध्या । वृत्तसेवा
श्रीराम मंदिराचे 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंदिर दुसर्‍या दिवसापासून भाविकांसाठी खुले होणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविक महासिंहद्वारतून पायर्‍या चढून थेट सिंहद्वारपर्यंत पोहोचू शकतात असे ट्रस्टकडून कळविण्यात आले आहे.
श्री राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या सिंहद्वाराचे चित्र मंदिर समितीकडून जारी केले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चार सिंह विराजमान असून ते शक्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अयोध्या राम मंदिराची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ट्रस्टने मंदिराच्या परिसरापासून ते प्रभू श्री रामाच्या गर्भगृहापर्यंत मंदिराच्या भव्यतेची माहिती नुकतीच एक्सवर शेअर केली आहे.
तीन मजली राम मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधले आहे. मुख्य गर्भगृहात प्रभू श्रीरामांची मूर्ती असून, पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असेल.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते, राम मंदिरात 5 मंडप (हॉल) असतील. यात नृत्य मंडप, रंगमंडप, संमेलन मंडप, प्रार्थना आणि कीर्तन मंडप आहे. सिंहद्वार येथून 32 पायर्‍या चढून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार आहे. मंदिराभोवती आयताकृती भिंत असेल. मंदिरात अपंग आणि वृद्ध यात्रेकरूंसाठीही विशेष सुविधा आहेत. रॅम्प आणि लिफ्ट देखील आहेत.
मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर (सीता कुप) आहे, जी प्राचीन काळापासूनची आहे. याशिवाय, 25,000 लोकांची क्षमता असलेले पिलग्रिम फॅसिलिटेशन सेंटर (झऋउ) बांधले जात आहे. यात यात्रेकरूंसाठी वैद्यकीय सुविधा आणि लॉकरची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Leave a comment