
बीड – निलेश पुराणिक
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंंबर रोजी संपणार आहे त्यामुळे विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्याच्या दुसर्याच दिवशी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे (विधानसभा निवडणुक वेळेवर झाली नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे) येणार्या विधानसभेमुळे सध्या प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असून विधानसभा निवडणुक येत्या 2 ते 3 महिन्यावर येवून ठेपली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशभरात अपेक्षेप्रमाणे यश मिळविता आले नाही त्यामुळे स्वबळावर सत्तास्थापनेचे त्यांचे स्वप्न भंगले आहे विशेष म्हणजे त्यांना देशातील क्रमांक दोनचे मोठे राज्य असलेल्या आणि विधानसभा निवडणुक याच वर्षी असलेल्या महाराष्ट्र राज्यात तर दोन अंकी संख्या देखील गाठता आलेली नाही इतकी कठीण परिस्थिती सत्ताधीश भाजपाची झाली आहे सर्व्हेमध्ये तर भाजपाला 350 ते 400 दरम्यानच सर्व जागा दाखवत होत्या मात्र झाले वेगळेच भाजपाला स्वबळावर 272 पर्यंत देखील जाता आले नाही.
दुसरीकडे इंडिया टुडे कडून मुड ऑफ नेशन असा कार्यक्रम आज तक या चॅनलवर दाखवला सर्व्हे झाला त्यामध्ये यशवंत देशमुख यांच्या सी व्होटर सर्व्हेने एक सर्व्हे घेतला असून त्या सर्व्हेनुसार त्यांनी महाविकास आघाडीला म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या त्रिकुट पक्षाने एकत्र निवडणुक लढविली तर 160 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि महायुतीला 120 च्या आसपास जागा मिळतील असे सांख्यिकी आकडे दाखवले होते म्हणजे सत्तेत महाविकास आघाडी असेल असे तो सर्व्हे म्हणत होता.
खरे म्हणजे सर्व्हेने दाखविलेले स्वप्न किती धोकादायक असते हे भाजपाला आता कळून चुकले असेल त्यातून ते कितपत सावरतील हे विधानसभा निवडणुकीत कळेलच परंतू एखादा सर्व्हे झाला आणि त्यात एखाद्या पक्षाला सत्ता मिळेल असे सांगितले की वेगळ्याच राजकीय हालचालीला वेग येतो ते म्हणजे एखादा नेता तिकीट न मिळाल्याने किंवा मिळण्याची शक्यता कमी असल्याने पक्ष सोडून दुसर्या पक्षाकडे जातो किंवा तिकीटासाठी वाद निर्माण होतात, अमुक विधानसभा मतदारसंघ याच पक्षाकडे राहील या कारणावरुन देखील नेत्या-नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक होते.
सर्व्हेमुळे महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवल्याने आत्तापासूनच आपल्या आमदारांची संख्या जास्तीची आली पाहिजे, जास्तीचे आणि महत्वाचे खाते असलेले मंत्रीपद आपल्यालाच आले पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाले आहे हे चित्र आताच दिसू लागले आहे. तसेच सर्वांनाच पाहिलेले असलेले मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्तापासूनच जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून होत असून, गेल्या निवडणुकीत केवळ 44 जागा मिळवणार्या काँग्रेसला देखील यावेळी लोकसभेत हत्तीचे बळ मिळाल्याने 150 जागांची मागणी काँग्रेस करत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी देखील मध्यंतरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा संख्याबळावर म्हणजे ज्यांचे जास्त आमदार निवडुण येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे ठणठावले आहे या सर्व बाबींवरुन तिन्हीही पक्षात आतापासूनच सत्तेसाठी ताणा-ताणी सुरु झाली असून ते कितीही एक असल्याचा आव आणत असले तरी व्यासपीठावरुन एकमेकांच्या पक्षाविषयी बोलत असतांना होत असलेली मागणी यावरुन काहीच लपून राहत नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपद पण मिळवायचे आहे जास्तीत-जास्त मंत्रीपद देखील मिळवायचे आहेत, जास्तीचे आमदार निवडुण आणायचे आहेत या सर्वांमध्ये गुंतल्यावर, महायुतीविरोधात लढायचे आहे, जनतेमध्ये जायचे आहे, एक-एक मतदारसंघामध्ये महायुतीविरोधात लढायचे आहे या गोष्टीचा विसर पडू शकतो. मध्यंतरी शिवसेनेच्या आ.नार्वेकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे की उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री म्हणून जाहिर करायचे नसेल तर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेवू नये फक्त शिवसेनेचेच काम करावे असे म्हणून एक प्रकारे महाविकास आघाडीच्या इतर मित्र पक्षांना आव्हानच दिले आहे.
2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांनी संयुक्तरित्या निवडणुक लढवून 161 जागा मिळवल्या त्यावेळी संजय राऊत किंवा शिवसेनेचे इतर नेते मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी पाहिजे म्हणून हट्ट करुन बसले आणि तो हट्ट पुर्ण होण्यासाठी कधीही पटत नसलेल्या किंवा विरुद्ध विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसबरोबर महाविकास आघाडी करुन मुख्यमंत्री पद मिळवले ते सरकार देखील पुर्ण 5 वर्ष टिकले नाही आता तर सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवल्याने आणि ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांनाच मुख्यमंत्रीपद असे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते बोलू लागल्यामुळे उद्धव ठाकरेंना 2019 च्याच परिस्थितीतचा पुन्हा सामना करावा लागू नये म्हणजे झाले.
तसेच सर्व्हेची आकडे किती खरी असतात हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालावरुन व मोठ मोठ्या पक्षाला बसलेल्या नुकसानीवरुन पहायला मिळते त्यामुळे त्याचीच री होवू नये म्हणजे झाले.