सत्ताधारी नेत्यांनो आपले वचननामे आठवा, कामे करा नाहीतर तख्त आणि ताज पलटविल्याशिवाय राहणार नाही

विधानसभेला राहिले केवळ 3 महिने
जनतेच्या मनातील प्रश्न
बीड शहरात अद्याप प्राणी संग्रहालय का झाले नाही ?
बीड शहरात सिटी बस का नाही?
महत्वाच्या चौकात स्काय वॉक देखील का झाले नाहीत?
बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी अद्ययावत मशिनरी सुविधा का नाही?

बीड । निलेश पुराणिक
निवडणूकांमध्ये वेगवेगळे वचन देवून निवडून यायचे आणि मग सात पिढ्यांची कमाई करुन ठेवायची हे एकच सुत्र सध्याचे राजकारणी वापरत आहेत. मात्र ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्या मुलभूत प्रश्नांशी आणि मतदारसंघातील प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही असं पुढच्या निवडणूकीपर्यंत चालू ठेवायचं हेच तर सध्या चालू आहे. निवडणूकांपूर्वीचे वचननामे आणि जाहीरनामे निवडणूकांनंतर कचरा कुंडीत जातांना दिसताच आणि आश्वासने हवेतच विरतात त्यामुळे जनतेने जाब विचारुन सत्ताधार्‍यांना त्राहीत्राही करुन सोडले पाहिजे तरच ही सर्व अनागोंदी थांबू शकेल. जनता वेडी नाही आणि तिला गृहीत धरु नये हा संदेश मतपेटीतून प्रभावीपणे जितका जाईल तितका मतदारांचा प्रभाव वाढत जाईल. निवडणूक येताच माता-भगिनी आणि वडीलधारी माणसांच्या पाया पडणार्‍या मतदाराला मतदारराजा किंवा जनता जनार्दन असे खोट- खोटं म्हणणार्‍या राजकारण्यांना कामे केली तरच मतदारराजा मतदान करेल असे सामर्थ्य मतदारांनी दाखवले पाहिजे. त्यामुळे बीडमधील नेत्यांनो आपण जनतेला दिलेले वचननामे आठवा नाहीतर जनता कोणालाच माफ करत नसते आजीला माजी करते म्हणजे आपले तख्त (खुर्ची) आणि ताज (नाव) विधानसभा निवडणुकीत जनता घालवल्याशिवाय राहणार नाही.
काही दिवसांत महाराष्ट्रासह, झारखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असून 8 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे त्या अगोदर ऑक्टोंबर-2024 मध्ये निवडणुका अपेक्षित आहेत.
बीड विधानसभेसाठी आजपर्यंत सर्व जातीचे, सर्व धर्माचे आमदार बीडमधील जनतेने भरभरुन मत देवून विधानसभेत पाठविले असे असतांना देखील बीड विधानसभेचे ज्वलंत प्रश्न आज देखील ‘जैसे थे’असेच आहेत. बीड जिल्ह्यातील मतदारसंघात माजलगाव धरण, मांजरा धरण, कुंडलिका धरण, मेहेकरी धरण ही धरणं सोडता पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न, चांगल्या रस्त्यांचा प्रश्न तसेच आरोग्य सुविधांचा प्रश्न आणि शिक्षणासाठी अभियांत्रिकी-वैद्यकीय महाविद्यालयांची कमतरता असल्यामुळे शैक्षणिक प्रश्न आहे तसेच आहेत त्यामुळे जे नेते आम्ही विकास केला, आम्ही कामे केली असे म्हणून जनतेकडून शाबासकी मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना मतदारांनी वचननामा दाखवून या संदर्भात काय झाले? हे विचारण्याची योग्य वेळ जवळ आली आहे.
बीड जिल्ह्यातील 6 विधानसभेतील शहरांना आणि बर्‍याच गावांना केंद्र सरकारच्या योजनेतील रस्त्यांच्या कामामुळे बायपास भेटला त्यामुळे गावातून वाहनांची रहदारी कमी झाली. परंंतू शहर अंतर्गत कोणत्या दर्जाचे आहेत हे सांगण्यासाठी नागरिकांनी रस्ते विथ सेल्फी हे अभियान राबवावे आणि ते फोटो आमदार महाशयांना शेअर्स करावे की काय? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
माजलगाव धरण कोणाला वरदान तर कोणी उपेक्षित
माजलगाव धरण हे 1986 साली तयार झाले. या धरणातून माजलगाव, बीड या शहरांना पाणीपुरवठा होतो परंतू परळी, गंगाखेड, नांदेड येथे दरवर्षी पाणी सोडण्यात येते बीड व माजलगाव यांची लोकसंख्या दरवर्षी वाढत आहे त्याबरोबरच पाऊस देखील म्हणावा तसा पडलेला नाही आणि बाहेर पाणी सोडावे लागते त्यामुळे धरण कोणाला वरदान आणि बीडकरांसह, माजलगावकर मात्र उपेक्षितच या सर्व कारणांनी पाणी कसे पुरणार?

लातूरसह व अंबाजोगाई, धारुर, केज शहरांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण कधीचे?
मांजरा धरण हे 1980 साली सुरु झालेले आहे. या धरणातून लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, 72 गावांना पाणीपुरवठा होतो. मांजरा धरण हे महाराष्ट्राच्या मध्यम धरणामध्ये गणले जाते परंतू वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच शेतीपिकांना, जनावरांना लागणार्‍या पाण्यामुळे सद्यस्थितीत मांजरा धरणावर पाणीप्रश्न भागत नाही.

कुंडलिका धरणाकाठचे ग्रामस्थ पावसावर अवलंबून
सोन्नाखोटा ता.वडवणी येथील कुंडलिका धरण हे मध्यम जलप्रकल्प असून या कुंडलिका धरणामुळे वडवणी आणि धारुर तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न अंशतः सोडवला जातो परंतू या भागात देखील पाऊस येणे म्हणजे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असल्याने येथील शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यापुढे पाणीसंकट असते.

मेहेकरी धरण
आष्टी नेहमी कष्टी अशीच बिरुदावली दुर्देवाने आष्टी परिसराला लागल्या जाते कारण मेहेकरी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा नसता ज्यावेळी कुकडीच्या पाण्याने सीना धरण भरल्या जाते त्यावेळी काहीकाळानंतर ते पाणी मेहेकरी धरणामध्ये सोडले जाते त्यामुळे आष्टीला पाण्यासाठी सर्वात जास्त संघर्ष करावा लागतो हे सर्वश्रुत आहे.

पाण्यासाठी गेवराई सुखी
गेवराई येथे जायकवाडीमधून पाणी मिळाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवला गेला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संपुर्ण जिल्ह्यात गेवराई सध्या तरी पाण्यासाठी सुखी असून कधी येथे वेगवेगळे उद्योग उभे राहतील याची वाट गेवराईकर बघत आहेत.

पाटोदा महासांगवीच्या तलावावर अवलंबून तर शिरुर कासार येथील तागडगाव उथाळा तलावावर अवलंबून असून या तलावावसाठी पाणी कमतरला झाल्यास शिरुर कासारला सिंदफणा तलावातून पाणीपुरवठा केला जातो
जिल्ह्याची एकुण लोकसंख्या ही 22 लाखाच्या वर आहे त्यामुळे या ठिकाणी धरणांची संख्या वाढविणे गरजेचे असतांना कोणत्याही प्रस्थापित सत्ताधार्‍याने हे काम का केले नाही असा प्रश्न उभा ठाकतोय. जिल्ह्यात पाण्यासाठी केवळ माजलगाव धरण, मांजरा धरण, कुंडलिका धरण, मेहेकरी धरण अशी 4 धरणे आहेत त्यामुळे पाऊस कमी पडला तर धरणात पाणीसाठा शिल्लक नसतो आणि पाऊस जर जास्तीचा पडला या 4 धरणातील पाणी वाहून दुसर्‍या जिल्ह्याला याचा लाभ होतो हे सर्व ज्ञात असतांना देखील राजकारणी पाण्यासारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे उद्योग येणे आणि बेरोजगारी हटणे हा प्रश्न दिवसेेंदिवस कठीण होत आहे.
…..
सहा मतदारसंघांमधील जिथे देव-देवतांच्या यात्रा आणि उरूस असतो तेथे विशेष काय विकास झाला?
जिल्ह्यात 6 मतदारसंघ आहेत जिथे देव-देवतांच्या यात्रा आणि मुस्लीम समाजाचा उरुस असतो अशा ठिकाणी काय विकास झाला याचा आढावा घेतला तर
अंबाजोगाई येथील योगेश्वरी चा मंदिर काही प्रमाणात परंतु मुकुंदराव दासोपंत या संतांचे जन्मस्थान, खोलेश्वराचे मंदिर अजूनही विकासापासून उपेक्षित तर परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी मानले जाणारे एक अत्यंत पवित्र मानले जाणारे वैजनाथ मंदिर येथे काही प्रमाणात विकास कामे झाली परंतु येथे देखील इतर ज्योर्तिलिंगाच्या ठिकाणी जशी व्यवस्था असते तशी नाही. तसेच बीड जवळील कपिलधार येथील स्वामी मनमत नाथांची समाधी असलेले मंदिर येथे नेकनूर कपिलधार रस्ता आजही व्यवस्थित शिर नाही., आष्टी येथील शहाबुखारीचा दर्गा आणि येळम येथील खुदाबक्षपीराचा दर्गा येथे विकास कामे झालेली नाहीत. बीड जवळील नामलगाव येथील गणपतीचे प्राचीन मंदिर रस्ता देखील व्यवस्थित रित्या नाही तसेच वाहनांची सोय नाही. बीड मधील कंकालेश्वर मंदिर जिथे मकर संक्रांत व महाशिवरात्र, श्री गजानन महाराज यांची पालखी उतरण्याची एकमेव ठिकाण असणारे कंकालेश्वर मंदिर आणि तिथून जवळ असणारा मुस्लिम बांधवांचा दर्गा या परिसरात बिंदुसरा नदीला थोडे जरी पाणी आले तरी दोन्हीही परिसरातला संपर्क तुटतो. दगडी पुल पाण्याखाली जातो त्यामुळे पर्यायी पुल का बांधता आला नाही. कंकालेश्वर मंदिर परिसरात एखादे भक्तनिवास आजपर्यंत का झाले नाहीइतकेच काय तर इथे पायर्‍या पडायला आलेले असताना डागडुजी देखील होत नाही. त्यामुळे सहा मतदारसंघांमधील जिथे विविध देवतांच्या यात्रा आणि उरूस असतो जातो तेथे विशेष असा काय विकास झाला असा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a comment