
बीड (प्रतिनिधी)- राज्यातील तापमानात रथसप्तमी दरम्यान वाढ झाली आहे. सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत त्यामुळे अनेक बीडकरांना थंडी आणि उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या बदलत्या वातावरणामुळे अनेक नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. याचा फटका सगळ्यात जास्त लहान मुलांना, वयोवृद्धांना जाणवत आहे. त्यामुळे पालकांना लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
थंड आणि उन्हाच्या अशा बदलत्या वातावरणात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांमध्ये बदलत्या वातावरणाचा सामना करण्याची क्षमता कमी असते. त्यातून ही मुले आजारी पडण्तायाचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं, गरजेचं आहे. बीडसह ग्रामीण भागातही मुले आजारी पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सर्दी, ताप, खोकला झाल्यास किंवा एखाद्या व्यक्तीच्या अथवा लहान मुल किंवा वृद्धांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहील.
मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होऊ लागली, मात्र गेल्या 15 दिवसांपासून ऊन्हामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिकांना उन्हाळा सुरु झाला की काय असे वाटू लागले आहे. सध्या बीडमध्ये 33 ते 34 अंशांदरम्यान उन्हाचा पारा गेला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून काहीसे थंड असलेल्या वातावरणात अचानक उकाडा जाणवू लागला आहे. घरातील पंख्यांना असलेला आराम संपला असून, घरोघरी दुपारच्या सुमारास पंख्यांचा तर कुठे कुलर आणि ए.सी.चा जोर वाढला आहे. त्यातच बीड शहरात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाल्याने आजारातही वाढ झालेली दिसून येत आहे.
लहान मुलांना सर्दीसह खोकला
सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि संध्याकाळी पुन्हा थंड वातावरण असल्याने लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. सहा ते आठ दिवसांत बरे होणारे सर्दी-खोकल्याचे आजार आता 15 दिवस राहात आहेत. अचानक ताप येणे, उलट्या होणे यासारख्या तक्रारींसह बालरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
तब्येतीत बिघाड जाणवल्यास लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा
थकवा येणे, तहान लागणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, अशी लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार करणे गरजेचे आहे तसेच जीभ कोरडी पडणे, रक्तदाब कमी होणे, हृदयात धडधड वाढणे, त्वचा लाल होणे, बेशुद्ध होणे, चक्कर येणे असे झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा तसेच भरउन्हात काम करणे टाळावे अन् पाणी पिणे वाढवा व नवजात बालके, लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्धमंडळी या व्यक्तींना ऋतुबदलामुळे आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी व प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बालरोगतज्ञ, डॉ.हनुमंत पारखे, जिल्हा रुग्णालय, बीड