नवनीत कावत आणि टीमचा माणुसकीचा संदेश

बीड । प्रतिनिधी ः-बीड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे अनेक ग्रामीण भागात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून, कपिलधारवाडी परिसरातील डोंगर उताराला भेगा पडल्याने गावकर्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावात संभाव्य धोका ओळखून संपूर्ण गाव विस्थापित करून नागरिकांना तात्पुरत्या निवार्यात हलवण्यात आले आहे.या संकटाच्या काळात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या पुढाकाराने आणि बीड शहर पोलीस स्टेशन, पोलीस बॉय संघटना, पोलीस मित्र व समाजातील काही जाणकार नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून पूरग्रस्त आणि विस्थापित कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत किराणा साहित्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू, ब्लँकेट्स आणि इतर आवश्यक वस्तू पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. ही मदत मिळाल्याने संकटात अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच तहसीलदार शेळके साहेब, नायब तहसीलदार सुपेकर साहेब आणि मंडळ अधिकारी शितल चाटे यांनी सहकार्य करून महत्त्वाची भूमिका बजावली.संकटाच्या काळात पोलिसांनी दाखवलेले सहकार्य आणि माणुसकीचा हात बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात घर करून गेला आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी केलेले हे समन्वयित कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.