बीडमध्येही फटका बसण्याची महायुती-महाविकास आघाडीला भिती?

बीड । निवेदक
अॅड.प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीमुळे अनेक ठिकाणी गेल्या 2019 च्या निवडणुकीत निकाल बदलले ज्याचा फटका राष्ट्रीय पक्षांसह, प्रादेशिक पक्षांना बसला. तसेच गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने बीडमध्ये देखील 90 हजारांपेक्षा जास्त मते घेवून एक वेगळीच छाप जनतेमध्ये उमटवली होती त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळणे हे अनेक पक्षांना त्रासदायक ठरेल तसेच वंचित बहुजन आघाडी बीडमध्ये देखील काही करिश्मा करेल अशी परिस्थिती सद्यस्थितीत वंचित बहुजन आघाडीला होत असलेल्या गर्दीवरुन दिसून येतेय त्यामुळे बीडमध्येही वंचितचा फटका बसण्याची महायुती-महाविकास आघाडीला भिती वाटतेय अशी चर्चा नागरिकांत होतांना दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे बीडचे उमेदवार अशोक हिंगे यांना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दिल्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांना मोठे आव्हान आहे. कारण अशोक हिंगे पाटील हे जातीने मराठा उमेदवार आहेत त्यांचे सामाजिक कार्य मराठा समाजाबरोबर बहुजन समाजातही चांगले आहे. अशोक हिंगे पाटील यांनी कोरोना काळात तसेच वाढती महागाईच्या विरोधात शासन दरबारी आवाज उठविला याचा फायदा होईल की नाही हे पाहण्यासाठी 4 जूनचे घोडामैदान जवळच आहे.
तसेच अशोक हिंगे हे सर्व धर्म बांधवांना सोबत घेवून चालणारे आहेत त्यांनी प्रचार चालू असतांनाच श्री.क्षेत्र नारायण गड देवस्थान मार्फत सिरसमार्ग येथे जावून नारळी सप्ताह सांगता प्रसंगी भेट देऊन गडाचे मठाधिपती महंत श्री.ह.भ.प.शिवाजी महाराज त्यांचे आशीर्वाद घेतले व परिसरातील मतदारांशी संवाद साधला.
दि.26 एप्रिल रोजी केज तालुक्यातील मस्साजोग, कळंबअंबा, आडस, सोनवळा, मुळेगाव, भावठाण, गांझी या भागात केलेला प्रचार दौरा आणि यापुर्वी अशोक हिंगे यांनी केलेले गेवराई तालुक्यातील राजणी, गढीफाटा, सिरसदेवी, भेंडटाकळी, गेवराई येथील दौर्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता दलित, मराठा समाज आणि इतर समाज हा देखील वंचितला फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी यावेळी काही वेगळा चमत्कार घडवेल की नाही हे आता 4 जूनच रोजी स्पष्ट होईल.
वंचित बहुजन आघाडीची ताकद ऐनवेळी निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून येते हे इतिहास सांगत असतो कारण गत निवडणुकीत सोलापूरमध्ये काय झाले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. बीड मतदारसंघात मुस्लिम समाजाची देखील ताकद मोठी आहे आणि वंचित बहुजन आघाडी धर्मनिरपेक्ष असल्या कारणाने मुस्लीम समाज देखील वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभा राहिल हे सांगता येत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी काय करिश्मा करेल याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.