रेन वॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज !

अग्रलेख
दिवसेंदिवस वाढती वृक्षतोड आणि निसर्गाच्या नियमा विरुद्ध चालणे मानवी जीवनाला किती महाग पडत चाललेले आहे हे सांगण्याची सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवरुन आणि पशुधनाला देखील पुरेसे पिण्याइतपत देखील पाणी नाही यावरुन दिसते की निसर्गाकडून मिळणार्‍या देणग्या जसे पाऊस, गावरान पीक हे मिळण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत. पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे पुनर्वापर यासाठी पावसाचे पाणी जमा करणे. यासाठी बीडमध्ये काही दिवसापूर्वी कोणी वाघ नामक ग्रहस्थ घरोघरी जाऊन स्वतः पुढाकार घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत माहिती देत होते आणि लोकांना भविष्यात येणार्‍या पाणीटंचाईच्या संकटापासून वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत होते/आहेत. खरोखरच अशी सामाजिक कार्य करणारे कौतुकास काय तर पुरस्कारास प्राप्त असतात. कारण एका सर्वेनुसार सतत पडणार्‍या दुष्काळाने आणि लोकसंख्या वाढीमुळे प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई वाढत आहे यासाठी पावसाचे पाणी घराच्या, इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात व वर्षभर पिण्यासाठी वापरतात. यातील माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी योग्य असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग, ही पावसाचे पाणी गोळा करण्याची प्रक्रिया आहे, ज्यावर पाऊस पडतो अशा कोणत्याही पृष्ठभागाचे हे पावसाचे पाणी असू शकते.त्यानंतर हे पाणी गाळले जाते आणि नंतर वापरासाठी साठवले जाते या पाण्याची साठवण करण्याविषयीची चांगली गोष्ट म्हणजे ती जमिनीतील पाण्याची पातळी सामान्य होण्यास मदत करते, हे पाणी वाया जात नाही आणि पाणीपातळी वाढविण्यासाठी देखील मदत करतात ते पण तोकड्या खर्चातच. शासकीय महामंडळांद्वारे आपल्याला पुरविल्या जाणार्‍या पाण्याला,आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी नेहमीच, थोडासा क्लोरीनचा वापर केला जातो.पावसाचे पाणी हे शुद्ध आणि इतर अनेक प्रदूषक आणि मानवनिर्मित दूषित घटकांपासून मुक्त असते.शुद्ध असल्या कारणाने ते जमिनीतील आणि वनस्पतींमधील मीठ वाहून नेऊ शकते आणि त्यामुळे खूप महत्वाचे आणि फायदेशीर ठरते. दरवर्षी पावसाळा सुरू झाला म्हणजे पाण्यासाठी आसुसलेली जमीन पाऊस पडल्याबरोबर पाणी प्यावयास सुरूवात करते. जमिनीच्या रंध्रांमधून, फटींमधून पाणी सातत्याने जमिनीत मुरतच राहते. व खोल जात जात ते भूपृष्ठाखालील जलसाठ्यात जमा होत राहते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढत जाते. यालाच आपण नैसर्गिक पुनर्भरण म्हणू या. वर्षभर होणार्‍या पाण्याच्या उपशामुळे ही पातळी खालावत जाते पण या पुनर्भरणामुळे ती पातळी पूर्वस्थितीवर आणण्यात निसर्गाचा मोठा वाटा आढळतो. अशा प्रकारे हे निसर्ग चक्र अव्याहतपणे चालत राहते याची मदत देखील पाण्याच्या गैरवापरामुळे वा अतिवापरामुळे कमी पडू लागली आहे. पाणीही राष्ट्रीय संपत्ती असून पावसाळ्यात पाणी वाहून जाते. ते जमिनीत गेले पाहिजे त्यामुळे पाण्याची भूजल पातळी वाढेल. त्याचा नागरिकांना चांगला फायदा होईल यासाठी जल पुनर्भरण आवश्यक आहे. त्यामुळे भूजल पातळी उंचावेल आणि अवर्षणाशी मुकाबला करता येईल. पाणी पातळी मध्ये वाढ करायची असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय पर्याय नाही असे चित्र दिसत आहे शासनाकडून आणि स्वतः नागरिकांकडूनच याची अंमलबजावणी व्हावी म्हणजे उद्या येणारे संकट आजपासूनच कोसो दूर पाठवल्यागत होईल. जर आपल्याकडे बोअरवेल असेल, तर भूगर्भातील पाण्यासाठी किती खोल जावे लागते हे आपणास ठाऊक असेलच.जस जशी जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत जात आहे, त्याच प्रमाणात पाणी मिळवण्यासाठी या विहिरींना अधिक खोलवर जाण्याची आवश्यकता भासत आहे.जेव्हा आपल्याला विहीर किंवा बोअरवेल अजून खोल खोदण्याची आवश्यकता असते, तेव्हा आपला अतिरिक्त खर्च होतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते जमिनीचा कवच कमकुवत करते आणि माती कोसळूही शकते त्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प छोट्या पैशात उभारणे कितीही चांगले पाण्याच्या वापराच्या समतोलाचे आणि निसर्ग नियमांचे उल्लंघन देखील ना करणारे आणि यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल आणि विहिरीचे पाणी वाढले आहे असे चित्रं आढळून आले आहे. शेवटी पाण्याचा प्रत्येक थेंब वाढवणे तो जमिनीत मुरणे हे नागरिकांची कर्तव्य आहे यासाठी जनजागृती देखील आवश्यकता आहे. मुसळधार पाऊस आणि पुराच्या वेळी आपल्याला दिसेल की पावसाच्या पाण्याने बर्‍याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जाते.परंतु, जेव्हा आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग ची व्यवस्था असते तेव्हा पाणी वाहून जात नाही, नंतर वापरण्यासाठी ते सुरक्षितपणे गोळा केले जाते. पूर कमी करण्याचा देखील हा एक चांगला मार्ग आहे. सध्या नैसर्गिक पुनर्भरणाचा वेग कमी होत आहे व दुसर्‍या बाजूने पाणी उपसण्याचा वेग मात्र सतत वाढतच चालला आहे. याचा दुहेरी परिणाम होवून जमिनीतील पाणी प्रश्नाला उद्याच्या एैवजी आजचेच आमंत्रण देवून आपण मोकळे झाले आहोत ही लाजीरवाणी बाब खरी आहे त्यामुळेच आता उद्याचे पाण्याचे संकट कोसो दुर पाठविण्यासाठी पाणीबचत, पावसाचे पाणी गोळा करणे आणि भुजल पातळी वाढविणे याच गोष्टी रामबाण उपाय ठरतील हे देखील खरे!

Leave a comment