राज्यात आठ मतदारसंघात तीनही पक्षाच्या दावेदारीमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात

काही प्रमुख पक्षांकडे उमेदवारांची वाणवा तर काही पक्षाकडे भाऊगर्दी

मुंबई । निवेदक
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या एकनाथ शिंदे शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबई मतदारसंघाचा वाद निर्माण झाला असताना इतरही आठ ठिकाणी तशीच परिस्थिती असल्याचं समोर येत आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेत शिवसेनेची वाट धरली आणि थेट दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले. या मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
केवळ दक्षिण मुंबईच नाही तर सध्या महायुतीत आणि महाविकास आघाडीत देखील विविध लोकसभा मतदारसंघावरुन धुसपूस सुरु आहे. भाजपने मिशन 45 प्लसचा विचार करता जर उमेदवार निवडून येणारा असेल तर प्रसंगी विरोधी पक्षातून आयात करुन निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे. तर महाविकास आघाडीत ज्याची ताकद जास्त त्यालाच सर्वांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
वाद निर्माण होऊ शकेल असे महायुतीचे मतदारसंघ
1) रत्नागिरी-सिंधुदुर्ग- शिवसेनेच्या किरण सामंत लढण्यास इच्छुक तर भाजपकडून रविंद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश.
2) रायगड- राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांनी विरोध करताना धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी.
3) शिरुर- अजित पवार यांनी मतदारसंघावर दावा केला, परंतु शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.
4) मावळ- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असा पक्षाकडून दावा करण्यात आला असला तरी राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीला जागा सोडण्याची अजित पवारांकडे मागणी केली आहे.
5) सातारा- अजित पवारांनी जागा लढणार असं म्हंटलं असलं तरी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आपणच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
6) कोल्हापूर- शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार, मात्र भाजपकडून अमल महाडिकांसाठी प्रयत्न सुरु आहेत.
7) अहमदनगर- भाजपचे सुजय विखे निवडणूक लढणार अशी चर्चा असताना निलेश लंके स्वतः लोकसभेसाठी तयारीत आहेत
8) संभाजीनगर लोकसभा युतीच्या जुन्या जागा फॉर्मुल्यानुसार शिवसेनेकडे येते. मात्र गेल्या वर्षभरापासून भाजपाचे भागवत कराड हे तयारी करत आहेत. शिवसेनेकडून देखील संदिपान भुमरे यांच्यासह अन्य नेते इच्छुक आहेत

Leave a comment