मुली व महिलांवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना खाकीचा हिसका दाखवा- मिनाक्षी देवकते यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

बीड (प्रतिनिधी)-बीड शहर आणि जिल्हाभरात सध्या प्रचंड प्रमाणात मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत, यामध्ये कधी मुलीला धमकावून बळजबरीने अत्याचार केल्याच्या आणि त्यानंतर पोलीस फिर्याद देवू नकोस नाहीतर तुला, तुझ्या परिवाराला मारुत अशा धमक्या देण्याचे प्रकार देखील उघडकीस आलेले आहेत त्यामुळे अशा गुन्हेगारांना खाकीचा हिसका दाखवा अशी मागणी बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष-धनगर समाज अहिल्या महिला आघाडी प्रदेश सचिव मिनाक्षी देवकते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.

पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या 02 दिवसापुर्वी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हद्दीमध्ये 08 वर्षाच्या बालिकेवर 3 अज्ञान वयाच्या मुलांनी अत्याचार केल्याची घटना घडवून शहर हादरुन सोडले आहे, यामध्ये सदरील मुलांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे परंतू अशा प्रकारामुळे जिल्हाभरात खाकीचा धाक राहिला नाही असे दिसून येते. तसेच अगोदर कॉफी शॉपमध्ये गेवराईतून मुलगी गाडीवर आणून तिच्यावरही अत्याचार केल्याची घटना घडली होती. ज्याला जबाबदार कॉफीशॉप मालकापासून ते आरोपीपर्यंत आहेत परंतू त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थिनीची छेडछाड, महिलांची छेडछाड तसेच मोबाईलवर अश्लिल मॅसेज पाठवणे असे प्रकार घडले आहेत.
तसेच शहरातील मुख्य भाग असलेल्या सहयोग नगर, सुभाष रोड, बलभीम कॉलेज परिसर, मिलीया कॉलेज परिसर, केएसके कॉलेज परिसर, आय. टी.आय कॉलेज परिसर, आदित्य इंजिनिअररिंग कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, बीड या परिसरात देखील मुलींची/विद्यार्थींनीची छेडछाड होत असते ज्यामुळे कधी याबाबत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल होते तर कधी मुली घरी कळू देत नाहीत किंवा कोणालाच काही सांगत नाहीत अशा घटना सहन करत बसतात. अशा प्रकारातूनच 2-4 वेळा विद्यार्थींनीनी/मुलींनी आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार घडलेला आहे.
त्यामुळे मुलींची/महिलांची छेडछाड करणार्‍या, त्यांच्या अत्याचार करणार्‍या आरोपीला खाकीचा धाक दाखवून जबर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

Leave a comment