आता काँग्रेसमध्ये फूट पडण्यास सुरुवात
मुंबई । निवेदक
लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. पक्षातील आणखी काही नेतेही काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी राज्यात काही अपवाद वगळता काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली नव्हती. पण लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. पक्षातील आणखी काही नेतेही काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आतापर्यंत राज्य काँग्रेसमध्ये गेल्या पाच वर्षात मोठी फूट पडलेली नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. अमरिश पटेल, चंद्रकांत रघुवंशी आदी नेते पक्ष सोडून गेले.
मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची संधी नसल्याने त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचा मार्ग पत्करला. त्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा अथवा राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.