भाजपाच्या दबावासमोर न झुकता वाहत्या गंगेत हात धुण्याचे शिंदे-अजित पवारांसमोर आव्हान
बीड । निवेदक
येणार्या 18 व्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. महाराष्ट्रात सत्तेच्या वर्गात बसण्याचा प्रत्येकाचा बेंच दिल्लीच्या मास्तरांनी ठरवून दिलेला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुढचे राजकारण कसे असेल हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कळेल.त्यामुळे जागावाटपात नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना मोठा संघर्ष करावा लागेल त्यांची ही लढाई वर्चस्वापेक्षा अस्तित्वाची अधिक असेल. शिवसेनेतील फूट व त्यानंतरचा घटनाक्रम आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरचा घटनाक्रम यात मोठा फरक आहे. शिवसेना असो की राष्ट्रवादी, दोन्ही पक्षांमधील न्यायालयीन लढाईपेक्षाही मोठी लढाई आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येऊ घातली आहे या सर्वांचे जागा वाटप ठरत असतांना होणारी तु-तु मैं-मैं यामुळे पॅसेंजरच्या इंजिनला एक्स्प्रेसचे डबे जोडले जात आहेत आणि हे इंजिन किती लोड घेईल गाडी किती धावेल अन् वेळेत पोहोचेल का या प्रश्नाचे उत्तर काही दिवसातच कळेल
महाविकास आघाडी अन् महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, अशा अंदाजित बातम्या प्रसारमाध्यमात झळकत आहेत परंतू अजूनही जागा वाटपाबाबत महायुती आणि महाविकास आघाडी पक्षांमध्ये यांच्यामध्ये जागावाटपाबाबत रस्सीखेच आहे. भाजपाने 400 पारचे टार्गेट फिक्स करण्यासाठी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या जास्त जागा असलेल्या मोठ्या राज्यात जास्तीचे जागा लढवणार असल्याचे दिसत आहे त्यासाठी त्यांनी विविध मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. राज्यासह देशाचे लक्ष्य असणारी बारामती ही जागा अजित पवार गट लढवण्यावर ठाम आहे व भाजपाकडून देखील त्यांना ती जागा अजित पवार गटाला सोडण्याचे प्रयत्न चालू आहेत तर दुसरीकडे नाशिक, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी या जागांसाठी शिंदे गट शिवसेना आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्ष तीसपेक्षा जास्त जागा भाजप लढविणार असे असले तरी त्यांच्या इतर दोन्ही मित्र पक्षांसाठी 18 जागा उरतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वतःचे 13 खासदार आहेत, ’सिटिंग-गेटिंग’ म्हटले तर मग उरतात फक्त पाच जागा. म्हणजे अजितदादांची बोळवण फक्त पाच जागांवर होईल की काय? म्हणजे जागावाटपाच्या वेळी तू तू-मैं मैं होईलच. त्यामुळे भाजपाच्या दबावासमोर न झुकता आपल्या झोळीत योग्य बाटा पाडून घेण्याचे आव्हान शिंदे-अजित पवारांसमोर असेल.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतचा यापुर्वी युतीमध्ये असतांना भाजपाला त्रास देण्याचा अनुभव शिवसेनेला आहे तो काँग्रेसबरोबर जागावाटप करतांना कामी येईल. हाती काही असो नसो; आक्रमकपणे चढाई करत हवे ते पदरी पाडून घेण्याचा पवित्रा ते घेतील. काँग्रेस ही भाजपइतकी सोपी नाही, हे ठाकरेसेनेला आता कळेल. काहीही करा, पण मित्रपक्षांना सोबत घ्या, असे राहुल गांधी यांचे कितीही आदेश असले तरी काँग्रेसचे दिल्ली-मुंबईतले नेते मातोश्रीचे हट्ट पुरवतील असे वाटत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडी देखील सोबत येते की नाही हे सांगणे कठीण त्यामुळे पॅसेंजरच्या इंजिनला एक्स्प्रेसचे डबे जोडले जात आहेत. अशावेळी इंजिन लोड किती घेईल, गाडी किती धावेल अन् वेळेत पोहोचेल का, हे प्रश्न आहेतच.शिंदेंकडे फक्त ठाकरेच नाहीत! शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने आधीच दिलेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालात त्यावर शिक्कामोर्तब केले. आता शिंदेंकडे पक्ष आहे, धनुष्य आहे, नाहीत ते फक्त ठाकरे. गेले काही महिने शिंदेंच्या राज ठाकरेंशी भेटी वाढलेल्या आहेत. अनेकदा दोघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. शिंदेंकडे ठाकरे नाहीत ही उणीव भरून काढण्याचा तर विचार नाही ना? राजकारण आहे; काही सांगता येत नाही. आज उद्धव यांच्याकडे ठाकरे ब्रॅण्ड आहे तोदेखील राज यांच्या माध्यमातून विभागला गेला तर शिवसैनिकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचे मोठे कारण शिंदे यांना मिळू शकते.
प्रियंका गांधी आता रायबरेली ऐवजी दमण दीवमधून निवडणूक लढवणार?
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार नाही तर प्रियंका गांधी आता रायबरेली ऐवजी दमण दीवमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.काँग्रेसच्या दमण दीव विभागाचे प्रदेशाध्यक्ष केतन पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. दमण दीव लोकसभा जागेवर भाजपच्या स्थितीबद्दल बोलताना, सलग चौथ्यांदा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार लालूभाई पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. अशा स्थितीत काँग्रेस या जागेवरून यावेळी मोठा चेहरा उभा करू शकते आणि प्रियांका गांधींना दमण दीवची जबाबदारी दिली जाऊ शकते असा दावा केला जात आहे.
बीडकडे सर्वांचेच लक्ष
माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नावाची सध्या लोकसभेवर चर्चा सुरु आहे. पंकजाताई यापुर्वी राज्यात नाही तर देशात देखील भाजपाच्या स्टार प्रचारक राहिलेल्या आहेत. महायुतीच्या जागावाटप करतांना बीड लोकसभेचा मुख्य विषय निघेल कारण की पंकजाताई मुंडे यांचा एकुण 25 पेक्षा जास्त मतदारसंघावर प्रभाव, त्यांच्या सभेला आणि त्यांनी काढलेल्या शिवशक्ती यात्रेला भरपूर गर्दी जमली या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत याकडे पक्षश्रेंष्ठीचे लक्ष तर असेलच त्यामुळे पंकजाताई मुंडे यांना लोकसभेवर घेवून मंत्रीपद बीड जिल्ह्याच्या वाट्याला दिल्यास रेल्वेसह, इतर दळणवळणाचे प्रश्न मार्गी लागतील.
बारामतीच्या चुरसीकडे सर्वांचेच लक्ष
बारामतीमध्ये खा.सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लोकसभेसाठी रंगत होईल अशी अटकळ बांधली जात आहे. सुप्रिया सुळे यांनी या अगोदर 3 वेळा बारामती मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे आणि एकवेळा त्या राज्यसभेच्या सदस्य राहिलेल्या आहेत तसेच त्यांनी उत्कृष्ट संसदपटु पुरस्कार देखील मिळविला आहे त्यामुळे अनुभव असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली तर त्या लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागेल.