नितीश कुमार पुन्हा एकदा तळ्यात-मळ्यात करण्याच्या तयारीत
पाटना । वृत्तसेवा
राजकारण म्हटले की क्रिकेटसारखा अनिश्चिततेचा खेळ, कधी काय होईल आणि कधी काय होणार हे सांगता येत नाही अशातच माध्यमांमधून बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दला यांचे महागठबंधन सरकार जावून पुन्हा नितीश कुमार हे भाजपासोबत हातमिळवणी करणार आणि येत्या रविवारी शपथविधी देखील होणार असे सांगितल्या जात आहे. त्यामुळे आता भाजपाशी युती केल्यास एकाच टर्ममध्ये दोन वेळा यू-टर्न घेण्याचा आरोप त्यांच्यावर होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा एकदा आरजेडीला खो देऊन भाजपाबरोबर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जनता दल (संयुक्त) अर्थात जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महागठबंधनमधून बाहेर पडणार असल्याची शक्यता गेल्या दोन दिवसांपासून वर्तविण्यात येत आहे. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करत सरकार स्थापन केले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा या आघाडीतून बाहेर पडून भाजपाशी हातमिळवणी करणार आहेत. येत्या रविवारी, 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल, अशी बातमी माध्यमातून दिली जात आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री तर सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
सुशीलकुमार मोदी यांनी या राजकीय घडामोडीबाबत बोलताना सांगितले की, बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, असेही ते म्हणाले.
महागठबंधनमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात गेल्या काही काळापासून सूप्त संघर्ष सुरू असल्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. अनेक काळापासून सूप्तावस्थेत असलेला हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. त्यातच केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार घोषित केल्यानंतर हा संघर्ष आणखी टोकाला गेला.
तसेच नितीश कुमार यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेला लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी एक्सवर पोस्ट टाकून तिखट उत्तर दिल्यानंतर दोन्ही पक्षांच्या तणावपूर्ण संबंधात आणखी ठिणगी पडली. रोहिणी आचार्य यांनी वाद उफाळल्यानंतर एक्सवरील पोस्ट डिलीट केली होती.
दरम्यान काँग्रेस पक्षातील सूत्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते बिहारमधील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भाजपाबरोबर अनेक वर्षांपासून असेलल्या चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांच्याबद्दल साशंकता दाखवून नितीश कुमार यांना भाजपाकडे परतणे सोपे जाणार नाही, असेही काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्ष आमच्या (राष्ट्रीय जनता दल) बाजूने आहेत, त्यामुळे भाजपाबरोबर जाणे अवघड होईल, असेही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
बिहारच्या विधानसभेतील सदस्यसंख्या 243 एवढी आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे 79 आमदार असून, त्यानंतर दुसर्या क्रमाकांवर भाजपाचे 78 आमदार आहेत. जदयू पक्ष विधानसभेत तिसर्या क्रमाकांवर असून त्यांच्याकडे 45 आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेसकडे 19, सीपीआय (एम-एल) कडे 12 आमदार आहेत. सीपीआय (एम) आणि सीपीआयकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे चार आमदार आणि एमआयएम पक्षाचा एक आमदार आहे.
2020 साली बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी एनडीएबरोबर निवडणूक लढवली. मात्र 2022 साली त्यांनी अचानक भाजपाशी काडीमोड घेऊन दुसर्यांदा आरजेडी पक्षाशी हातमिळवणी केली होती.