शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी
बीड (प्रतिनिधी)- तालुक्यातील नवगण राजुरी येथील रोहन बहिर याने दि.26/09/2021 रोजी गावातील डोमरी नदीमध्ये बुडणार्या एका महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल त्यास 2023 चा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार दि.26.01.2023 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मानपत्र, मेडल व 1 लाख रुपये देवून प्रदान करण्यात आला आहे अशा बीडचा भूमीपुत्र रोहन बहीर याचा धडा बालभारतीच्या पुस्तकात प्रकाशित करावा अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने डॉ.संजय तांदळे व सतिश जायभाये यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या मार्फत दि.21.12.2023 रोजी निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी किशोर अंकाचे प्रकाशन नेहमीच केले जाते व राज्यातील सर्व शाळेत किशोर अंक वितरीत केला जातो. डिसेंबर 2023 च्या किशोर अंकामध्ये दिलीप फलटणकर यांनी लिहिलेला धाडसी रोहनचा लेख प्रकाशित झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील पार्डी गावात दि.30 एप्रिल 2017 रोजी नदीत बुडणार्या 2 मुलींचे एजाज नादाफने प्राण वाचविल्याबद्दल त्यास 2018 चा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त झाला होता त्याच्या या धाडसी कार्याची दखल घेवून शासनाने 2024-25 शैक्षणिक वर्षात उर्दू बालभारतीच्या इ.6 वीच्या पुस्तकात एजाज नादाफच्या शौर्याचा धडा शिकविला जाणार आहे. या प्रमाणे रोहन बहीर याच्या शौर्याची दखल घेवून मराठी बालभारतीमध्ये त्याच्या धडाचा समावेश करण्यात यावा. या मागणीबाबत निवेदन देवून रोहन बहीर या बीडच्या भूमिपुत्राने देखील स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धाडस करुन डोमरी नदीमध्ये बुडणार्या एका महिलेचे प्राण वाचवून अतुलनीय शौर्य दाखविले आहे त्यामुळे त्याचा सरकारकडून पुरस्कार देवून गौरव देखील करण्यात आला तरी त्याचा धडा बालभारतीच्या पुस्तकात घेण्यात यावा अशी मागणी शिक्षणमंत्री तथा पदसिद्ध अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ, पुणे यांच्याकडे केली आहे.