फुलांचं आयुष्य कोमेजून जातं, पैसे ही वाया बुकेचा अनावश्यक खर्च टाळा

माझं सर्व भगिनी आणि बांधवांना एकच सांगणं आहे की कोणत्याही घरी वाढदिवस असो किंवा अनिवर्सरी असो किंवा कुठलेही मंगल कार्य असो गिफ्ट म्हणून आपण काय द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतू प्रत्येक घरी हा माझा मेसेज पोहोचवा म्हणून मी छोटासा प्रयत्न करत आहे
लहानपणापासून घरची म्हणजे माहेरची परिस्थिती हालाकीची असल्याने पैशांची बचत करण्याविषयी आपोआपच सवय लागून गेली. नेतेमंडळींच्या वाढदिवसाचा थाट आपल्या परिचयाचा असतो. पण आपल्या अनुयायांना विश्वासात घेत साधेपणे आणि त्यातही लोकहिताच्या कामाने वाढदिवस करणारे मोजकेही आहेत काही नेते ज्यांची ना पोस्टरबाजी, ना मेजवानी, ना डीजे, ना हारतुरे, ना अन्य कुठली भेटवस्तू.
पुष्पगुच्छ देण्याची पद्धत मला स्वतःला मनापासून मुळीच आवडत नाही. फुलं ही झाडावरच छान दिसतात. आपण ते पुष्पगुच्छ विकत घेतो, एखाद्याला देतो. त्या पलीकडे त्याचा काय उपयोग आहे? काहीच नाही. घेणारी व्यक्ती त्याबद्दल आभार मानते की गेला तो पुष्पगुच्छ कोपर्‍यात. त्यांची केलेली रचना, ती रचना करण्याची कल्पकता, त्याची कला, याची दाद नक्कीच देईन मी. पण 2 मिनिटांहून कमी वेळ ती फुलं हातात राहतात आणि कोपर्‍यात सुकून जातात. त्या निष्पाप फुलांचं आयुष्य तर कोमेजून जातंच, पैसे ही वाया एका अर्थाने. (त्या कलाकाराला त्याच्या मेहनतीचे नक्कीच मिळतात, पण ज्यांना भेट देतोय, त्यांना तरी काय उपयोग आणि आपल्याला तरी काय उपयोग ना?) त्यामुळे पत्रिकेत लिहिलेलं असूदे किंवा नसूदे, मी पुष्पगुच्छ भेट म्हणून देण्यासाठी कधीच पसंती देत नाही.राहिला प्रश्न तो गिफ्ट देण्याचा, तर, काही कुटुंबांची आणि आपली खूप जवळची नाती असतात. काही नातलग म्हणून तर काही ओळखीचे, चांगले मैत्र असलेले म्हणून. तर अशी नाती असलेल्या लोकांना आम्ही जेवण म्हणून, किंवा वेळ खूप नसेल तर काही खाण्यासाठी म्हणून घरी बोलावतो, केळवण म्हणतो आम्ही त्याला. की आम्ही तुमच्या कार्यात आनंदाने सहभागी आहोत. आणि त्याच वेळी जो आहेर द्यायचा आहे, तो देतो. जेणेकरून मुख्य समारंभाच्या वेळी स्टेज वर देताना त्यांना अथवा बाकी लोकांना अवघडल्यासारखं वाटू नये. पण हे झालं जवळच्या नात्यांत. काही ओळखीचे असतात, पण काही निमित्ताने झालेले. खूप ओढ अशी म्हणता येत नाही. पण मग त्यांना आहेर दिला, की त्यांना या गोष्टीचं ओझं वाटू शकतं. यांनी आपल्याला भेटवस्तू दिली, आता आपल्याला परतफेड करावी लागणार ही भावना मनात येते. त्यामुळे मला असा आहेर देणें घेणें ही पद्धत नसते, तीच जास्त चांगली वाटते. तुम्हीही आम्हांला देऊ नका, आम्हीही तुम्हांला देत नाही. फक्त एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊ.
एकदा असे झालं की, आम्ही एका संध्याकाळी स्वागत समारंभाला एका कार्यक्रमाला गेलो होतो. पत्रिकेत त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता, की आहेर किंवा गुच्छ आणू नयेत. पण खूप लोकांनी तरीसुद्धा आहेर आणला होता, आणि चक्क स्टेजवर तो स्वीकारलादेखील जात होता. त्यामुळे ज्यांनी काहीच नेलं नव्हतं (सूचनेप्रमाणे) त्यांना साहजिकच कानकोंडं झालं. एका कुटुंबाने तर हळूच विचारलं सुद्धा, काय हो, आहेर घेणार होते का हे?? आम्ही तर फोन करण्याच्या बहाण्याने बाहेर गेलो व एक पुष्पगुच्छ घेवून आलो.
आता हा असा अनुभव आला, की माणूस ताकही फुंकून पितो. म्हणून त्याच महिन्यात अजून एका स्वागत समारंभात आम्ही काही आणू नये असं सांगितलेलं असतानाही आठवणीने फुलं घेऊन गेलो.
काल-परवा वाचनात आले की, कोणत्या एका मोठ्या अधिकार्‍याने पदावर नियुक्ती झाल्यामुळे पुष्पगुच्छ आणू नका ? येतांना पुस्तके घेवून या असे सांगितले. कारण त्यांना शालेय स्तरावर गरीब विद्यार्थ्यांना आणि वाचनालयाच्या ठिकाणी वाचकांसाठी सुविधा करायची होती. त्यांना सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि कार्यालयातील सर्व भेटायला येतील याची पुरेपुर जाणीव होती म्हणून त्यांनी पुस्तके घेवून यायला हक्काने सांगितली त्यामुळे त्यांच्या कॅबिनमध्ये पुस्तकांचा ढिग साचला होता व तो समजाच्या उपयोगी देखील आला त्यामुळे बुके आणि गिफ्टचा खर्च टाळा असाच आग्रह समाज बांधव आणि भगिनींना राहील काय लिहावे इतकेच.
नम्रता पुराणिक, बीड

Leave a comment