रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून माहिती
अयोध्या । वृत्तसेवा
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणार्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. श्रीराम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी (15 जानेवारी) याला दुजोरा दिला. कृष्णशीळेवर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले.या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व 131 पुजारी दुपारी 12 वाजता रामजन्मभूमी गाभार्यात पोहोचणार आहेत. तर श्रीरामाची मूर्ती गाभार्यात स्थानापन्न करण्याचा मुहूर्त दुपारी 1.20 ते 1.28 दरम्यान आहे. हा विशेष मुहूर्त आहे. याच मुहूर्ताला मूर्ती विराजमान होईल आणि त्यानंतर 24 वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केल्या जातील आणि 12 वाजल्यापासून सुरू होणारी प्राणप्रतिष्ठा 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्व मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील.