पंढरपूर वारीने जिंकले संपूर्ण भारतीयांचे मन

बीड । निवेदक
सांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र ,दिल्ली अर्थात सी सी आर टी दिल्ली द्वारा विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. नविन शालेय शैक्षणिक धोरण 2020 च्या’ अनुषंगाने शिक्षणात हस्तकला कौशल्याचा समावेश ’ विषयावरचे प्रशिक्षण द्वारका, दिल्ली येथे सुरू आहे. या प्रशिक्षणात विविध हस्तकलांचा परिचय आणि प्रशिक्षण दिले जाते. तसेच विविध राज्याच्या लोककला सादर करण्यात येतात या प्रशिक्षणात मॅक्रम क्राफ्ट,, बुक बाईंडिंग ,मातीच्या भांडी बनवणे,, कपड्यावरील सुंदर नक्षीकाम इत्यादी हस्तकला व विविध उपक्रमांचा समावेश करण्यात येतो.
या प्रशिक्षणा दरम्यान विविध राज्यांच्या लोककला सादर केल्या जातात. दिनांक 22 रोजी महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात लोप होत चाललेले वासुदेवाच्या गीताने ’वासुदेव आला रे वासुदेव आला’ ने सुरुवात करण्यात आली . महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा सण आषाढी एकादशी निमित्त विठू रखुमाईच्या दिंडी सोहळा पार पडला.महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक शाहू ,फुले,आंबेडकर यांच्या कार्याचे सादरीकरण केले.महाराष्ट्रातील हस्तकला, लघुउद्योग कोल्हापुरी चप्पल ,सोलापुरी चादर,पैठणी साडी, वारली चित्रकला आदीचे सादरीकरण करण्यात आले. वारकरी संप्रदायातील महिला संत असलेल्या संत जनाबाई, संत मुक्ताबाई आणि संत सोयराबाई यांच्या विषयी माहिती देण्यात आली. पोळा, नारळी पौर्णिमा सणांचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. यावेळी महाराष्ट्रातील वारकरी दिंडीचे प्रात्यक्षिक सर्व भारतीयांना खूप आवडले. पारंपरिक वेशभूषा करून ’माऊली माऊली ’ या गीतांच्या माध्यमातून दिंडी आणि पालखी सोहळा दाखविण्यात आला. देशातील विविध 19 राज्यातील शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झालेले आहेत सर्वांनी ’माऊली माऊली’ म्हणत प्रचंड प्रतिसाद दिला.’ जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या वतीनेपद्मजा हंपे( बीड, ) अमित दुडवे (जळगाव),अबरार मनियार( नाशिक),रवींद्र गुंजाळ (अहमदनगर,) लोकेश चौरावार( गोंदिया) आणि माधव गव्हाणे (परभणी)यांनी वरील कला सादर करून संपूर्ण भारतवासीयांचे दिल्लीत मन जिंकले.

Leave a comment