अखेर लक्ष्यवेधचा अंदाज खरा ठरला
बीड । निवेदक
दि.16 जानेवारी 2024 रोजी बीड लक्ष्यवेधने ‘मोदींची खात्री, पण प्रितमताई की पंकजाताई नावावरुन साशंकता’ या मथळ्याखाली मुख्य बातमी प्रकाशित केली होती कारण भाजपाचे राजकारण हे न कळण्याजोगे आहे टी-ट्वेन्टी क्रिकेटपेक्षाही जलद आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील हे सहजासहजी कयास बांधणे कठीण काम असते. भाजपचे राजकीय डावपेच / खेळ हे क्रिकेटच्या खेळासारखे अनिश्चिततांचा खेळ म्हणजे कधी कोणाचे तिकीट कापणार किंवा कधी कोणाला तिकीट देवून उभा करतील याबाबत सांगणे अनिश्चित झालेले होते. आज दि.13 मार्च 2024 रोजी भाजपाकडून लोकसभेसाठी दुसरी यादी घोषित करण्यात आली आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंकजाताई मुंडे यांचे नाव जाहीर झाली आहेत.
लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी आरक्षित व्हावे याकरिता 128 वी घटनादुरुस्ती करुन महिला सशक्तीकरणावर भर देणारे भाजपाने गतवेळेस एवढी उमेदवारांची संख्या बदल करुन कायम ठेवली आहे. अजूनही पुनम महाजन यांच्या उत्तर मध्य मुंबई येथील उमेदवारीबाबत प्रश्च चिन्ह कायम ठेवत आज रोजी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत राज्यातील नितीन गडकरी (नागपूर) पंकजा मुंडेंसह (बीड), सुधीर मुनंगटीवार (चंद्रपुर), मुरलीधर मोहोळ (पुणे) यांना लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजाताई मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली आहे.
तर मराठवाड्यातील नांदेडच्या जागेसाठी प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी देवून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाची मिनल खतगावकर यांना नाकारले आहे.
महाराष्ट्रातल्या 20 जणांची नावं भाजपाने जाहीर केली आहेत. आता आणखी किती जागा भाजपा घेणार आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला किती जागा येणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.