अॅड.बालाप्रसाद सारडा यांच्या युक्तीवादाला यश
बीड । निवेदक
नजीर अहमद तांबोळी (रा.बीड) यांच्या दुकानात दि.09.06.2013 रोजी चोरी झाल्यामुळे मालाचे, फर्निचरचे व इतर साहित्याचे नुकसान झाले होते. सदरील दुकानावर व मालावर द न्यु इंडिया अॅश्युरंन्स कं.लि.शाखा बीड यांच्याकडे विमा उतरविलेला होता. परंतू सदरील विमा कंपनीला तांबोळी यांनी वारंवार तक्रार देवून सुद्धा विमा कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तर देवून टाळाटाळ केली जात होती या प्रकरणी अखेरीस नजीर तांबोळी यांनी अॅड.बालाप्रसाद सारडा यांची भेट घेवून सदरील प्रकाराची माहिती दिली. यावेळी अॅड.बालाप्रसाद सारडा यांनी तक्रार लक्षात घेवून मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड यांच्याकडे प्रकरण दाखल करुन न्याय मिळवून दिल्याने संबंधित विमा कंपनीला चांगलाच हादरा बसला आहे.
याबाबत विस्तृत माहिती अशी की, नजीर अहमद तांबोळी यांचे शहरातील कारंजा रोडवर इब्राहीम अॅण्ड सन्स या नावाने होलसेल टोबॅकोचे दुकान होते. दि.09.06.2013 रोजी त्यांच्या दुकानामध्ये चोरी होवून मालाचे, फर्निचरचे व इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यानंतर तांबोळी यांनी पोलीसात तक्रार देत विमा कंपनीला देखील तक्रार केली होती. परंतू कसलीही कार्यवाही विमा कंपनीकडून होत नसल्याने अॅड.सारडा यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल केली. सदरील तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी झालेला 5 वर्ष 35 दिवस इतका विलंब मा.आयोगाकडून मंजूर केला व प्रकरण नियमित दाखल करुन घेतले. त्यानंतर आयोगाने विमा कंपनीला नोटीस काढली. त्यानंतर विमा कंपनीने आपले म्हणणे मा.आयोगाकडे मांडले व दोघांचाही मा.आयोगासमोर युक्तीवाद झाला. त्यामध्ये नजीर तांबोळी यांची बाजू सक्षमपणे मांडल्यामुळे ग्राहक आयोगाने विमा कंपनीने नजीर तांबोळी यांना दुकानाच्या विम्यासाठी आरक्षित रक्कम रु.4 लाख, मानसिक व शारिरीक त्रासापोटी 5 हजार व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5 हजार निकाल मिळाल्यापासून 30 दिवसात देण्याचे आदेशित केले. जर सदरील रक्कम तक्रारदाराला मुदतीत दिली नाही तर निकाल दिनांकापासून संपुर्ण रक्कम अदाकरेपर्यंत त्यावर द.सा.द.शे 8 टक्के दराने व्याज देण्याचे आदेशित केले. सदरील तक्रारीसाठी अॅड.सय्यद नासेर पटेल व अॅड. सय्यद आसमा पटेल यांनी सहकार्य केले.