जलयुक्त शिवार टप्पा -2 च्या कामाला गती द्या
बीड । निवेदक
जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हयातील पाणी आरक्षण संदर्भातील बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, निवासी उप जिल्हाधिकारी शिव कुमार स्वामी यांच्यासह संबधित विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या वर्षी जिल्हयात दुष्काळ सदुश्य परीस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री मुंडे यांनी जिल्हयातील कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, मुख्य अभियंता आणि सबंधित अधिकार्यांची दूरदृश्य प्रणाली माध्यमाव्दारे बैठक घेऊन पुढील काळात जिल्हयातील पिण्याच्या पाण्याची पातळी खाली जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात पाणी टंचाई होऊ नये तसे नियोजन करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
जिल्ह्यात ऑक्टोबर-2023 अखेर उपलब्ध झालेला पाणीसाठा हा नजीकच्या काळात येणारा दुष्काळसदृश्य परिस्थिती संदर्भात राखीव ठेवण्याबाबत सूचना श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात एकूण 143 पूर्ण प्रकल्प व 23 बांधकामाधीन प्रकल्पाद्वारे नगरपरिषद, ग्रामपंचायत यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पालकमंत्री यांनी सर्व नगरपरिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दृकश्राव्य (त.उ.) माध्यमाद्वारे अडचणी जाणून घेऊन सर्व नागरिकांना जास्तीत जास्त वेळेत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा बाबत मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत प्रति महिना आढावा घेण्याबाबत सूचना यावेळी केल्या. दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ विविध विभागांनी आपल्या अखरित्यात चालू असलेल्या योजनांचा आढावा घेऊन जास्तीत जास्त प्रयत्न करून दुष्काळसदृश्य स्थितीबाबत दाहकता कमी करण्याचे यावेळी निर्देशित केले.
जलयुक्त शिवार टप्पा -2 च्या कामाला गती द्या
जलयुक्त शिवार टप्पा -2 सुरू झाला असून जिल्हयातील कामाला गती द्या असे, निर्देश जिल्हयाचे पालक मंत्री धंनजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. जिल्हयातील जास्तीत जास्त गावांमध्ये जलयुक्त शिवार निर्माण करण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार करण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन द्या, त्यासाठी प्रचार-प्रसार मोहिम आखा असे ही श्री मुंडे यावेळी म्हणाले. जलयुक्त शिवार प्रथम टप्प्यात जिल्ह्याने चांगले काम केले असून या टप्पा 2 मध्ये जिल्हा आघाडीवर असेल अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त केली.
जलयुक्त शिवार टप्पा दोन मधील कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केली असल्याचे श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले. यांतर्गत जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार सह अन्य जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे केले जातील, असे नियोजन करा असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.