महाराष्ट्र विकास आघाडीचे चंद्रकांत हजारे एक आश्वासक चेहरा-अॅड.पाटील

बीड । निवेदक
आज राज्यात आणि देशात राजकीय परिस्थिती विदारक झालेली आहे.देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासोबतच हा देश वाचवण्याची देखील नैतिक जबाबदारी आता आपल्यावर आली आहे.यामुळे कोणाचाही द्वेष न करता महा – राष्ट्र विकास आघाडी जाहीरनामा नव्हे तर एक उद्देशिका समोर ठेवून लोकसभेच्या निवडणूक रणांगणात उतरली आहे.आम्ही महाराष्ट्रात 15 ते 16 ठिकाणी उमेदवार उभे करणार असून आम्हाला सामान्य मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वर्धा, बुलढाणा, परभणी, नगर, माढा, मुंबई, लातूर,नाशिक या ठिकाणी उमेदवार उभे केलेले असून बीड लोकसभेसाठी आम्ही चंद्रकांत हजारे या सामान्य चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिली आहे. ते नक्कीच बीडकरांचे आश्वासक म्हणून लोकसभेत जातील असा विश्वास पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.बीड येथे मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता महा – राष्ट्र विकास आघाडीची राजकीय भूमिका सांगण्यासाठी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर बीड लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत हजारे यांच्यासह अँड अनिरुद्ध येचाळे, निखिल भातांब्रेकर, राजाभाऊ सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अण्णाराव पाटील म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना राष्ट्रीय पातळीवर 2009 मध्ये करण्यात आली. आम्ही यावेळी देशातील, राज्यातील राजकीय अस्थिर परिस्थिती लक्षात घेता या देशाला, देशातील संविधानाला आणि आदर्श लोकशाहीला वाचवण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. आमचा पक्ष नवीन आणि सामान्य परंतु स्वाभिमानी जनतेचा आहे.आमच्याकडे धनसंपत्ती नाही. मात्र या देशाला वाचवण्याची, लोकशाहीला टिकवण्याची आणि संविधानाला संवर्धन करणारी विचारांची प्रगल्भता आमच्याकडे आहे. हेच सकारात्मक विचार घेऊन आम्ही मतदारांमध्ये जागृती करत आहोत. आम्ही प्रामुख्याने देव,धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंगभेद विरहित राजकारण असा नारा दिला आहे. या सोबतच राष्ट्रीयत्वाला प्राधान्य, कर्जमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारा निर्णय, मोफत आणि दर्जेदार ते ही एकसमान शिक्षण, तरुणाच्या हाताला कामासह उद्योग, व्यापार आणि नंतर नोकरी, नद्याजोड प्रकल्पाची अंमलबजावणी, शेत मालासाठी किफायतशीर दर देण्याचा निर्धार असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधींचे भत्ते पेन्शन कायमचे बंद तरच देशातील विकास कामावर लक्ष देता येईल असा आमचा विश्वास आहे,तसेच मंदिर,मज्जित,गुरुद्वार, विहार यांच्यासाठी होणारा शासकीय खर्च कपात करणे, उपेक्षित वंचित विस्थापितांसाठी सत्ता असा नारा देत आम्ही लोकसभा निवडणुकीच्या विकास यात्रेत सहभागी झालो आहोत. आज देशात राज्यात एकही राजकीय पक्ष विश्वासाला पात्र नसल्याने आम्ही कुणासोबतही युती, महाआघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळेच बीड लोकसभेसाठी आम्ही सामान्य कुटुंबातील चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्या मधून घडलेला सामान्य नेता चंद्रकांत हजारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना बीड जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लोकसभेच्या सभागृहात ते बीडकरांचे एक आश्वासक चेहरा म्हणून जातील असा विश्वास अँड अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.